खासगी कंपनीच्या बनावट ई-मेलचा वापर करून २२ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: July 15, 2023 06:28 PM2023-07-15T18:28:16+5:302023-07-15T18:28:40+5:30
पुणे जिल्ह्यातील कोंढवा खुर्द परिसरात घडली घटना
भाग्यश्री गिलडा, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ई-मेलद्वारे व्यवहाराबाबत संवाद सुरु असताना खासगी कंपनीच्या ई-मेल आयडीशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेलचा वापर करून एका व्यवसायिकाची फसवणूक केल्याची घटना कोंढवा खुर्द परिसरात घडली आहे.
समीर महेंदरपाल कंपानी (वय ५४, रा. कोंढवा खुर्द) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, ते एका खाजगी कंपनीसोबत उत्पादनाच्या आयात-निर्यातीसंबंधित ई-मेल द्वारे संपर्कात होते. कंपनीसाठी कोणकोणती उपकरणे लागणार आहेत हे त्यांनी इमेलद्वारे सांगितले होते. रिकार्ड नामक इसमाने व्यवहाराबाबतचा संवाद सुरु असताना खासगी कंपनीच्या ई-मेल आयडीशी साधर्म्य असणारा बनावट ई-मेल आयडी तयार केला. त्याचा वापर करून कंपानी यांना अमुक अमुक उपकरणे उपलब्ध असून ते निर्यात कारण्यासाठी अंशतः पैसे जमा करावे लागतील असे सांगितले. सांगितल्याप्रमाणे कंपानी यांनी भारतीय चलनात एकूण २१ लाख ८७ हजार ८५२ रुपये पाठवले. मात्र काही कालावधी उलटला तरी उपकरण न मिळाल्याने कंपानी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक पाटणकर पुढील तपास करत आहेत.