धक्कादायक ! पुणे, मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यास मांडूळ तस्करी प्रकरणात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:43 AM2020-06-11T11:43:15+5:302020-06-11T11:44:42+5:30
संबंधित कर्मचारी ड्युटीवर मांडूळ विक्री करण्यासाठी गेल्यानंतर वनविभागाने केलेल्या कारवाईत धक्कादायक सत्य समोर
पुणे : मुंबईतील सहायक निरीक्षक आणि पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात काम करत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नाशिक शहरात मांडूळ तस्करी प्रकरणात पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात विशेष म्हणजे संबंधित कर्मचारी ड्युटीवर असताना कोणालाही न सांगता बाहेर पडला होता. मांडूळ विक्री करण्यासाठी गेल्यानंतर वनविभागाने केलेल्या कारवाईत पकडले असल्याचे सांगण्यात आले.
सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके आणि पोलीस कर्मचारी दीपक धाबेकर अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी नाशिक ग्रामीण येथील येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक निरीक्षक विश्वास चव्हाण हे पूर्वी पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यास होते. ते चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात नेमणूक होती. त्यांना पाषाण पोलीस चौकी देण्यात आली होती. तर कर्मचारी दीपक धाबेकर हे देखील याच चौकीत नेमणुकीस होते.