पुणे पाेर्शे अपघात प्रकरण: अग्रवाल बाप-लेकाचा मुक्काम आता येरवड्याच्या कारागृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:49 AM2024-06-01T11:49:51+5:302024-06-01T11:50:52+5:30
चालकाला डांबल्याप्रकरणी १४ दिवस न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाने केलेला गुन्हा अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करून त्याला बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या बाप-लेकाचा मुक्काम आता येरवडा कारागृहात असणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी हा आदेश दिला.
सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३४२ (चुकीच्या पद्धतीने कैदेत ठेवणे), कलम ३६५ (अपहरण), कलम ३६८ (बेकायदा लपवून ठेवणे किंवा डांबून ठेवणे), कलम ५०६ (धमकावणे) या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
जामिनासाठी अर्ज करता येणार
दरम्यान, न्यायालयीन कोठडी झाल्याने आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल व विशाल अग्रवाल यांना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विशाल अग्रवाल याने जामिनासाठी अर्ज केला आहे.
चालकाचे अपहरण करण्यासाठी अग्रवाल बाप-लेकाला कोणी मदत केली, बंगल्यातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात छेडछाड करण्यासाठी कोणी मदत केली, याबाबत अग्रवाल बाप-लेक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, असे तपास अधिकारी खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयात सांगितले.
पुणेकरांची माफी मागा : धंगेकर
“माझ्यावरच्या कायदेशीर कारवाईचे सोडा, तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा. कारण, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वारसा पब संस्कृतीनेच बिघडवला आहे.तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात,” अशा तिखट शब्दांमध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना प्रत्युत्तर दिले.
सरकारच्या निष्क्रियतेने बदनामी : सुळे
अपघात प्रकरणात सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांकडून दररोज वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत. पुण्याची ही बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत आहे. हे सरकार गंभीर नाही. घरे फोडा व पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच त्याचा उद्योग आहे, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुलाची पोलिस चौकशी करणार
- आरोपी अल्पवयीन मुलाची पुणे पोलिस बाल निरीक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत. या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाकडे अर्ज केला होता.
- चौकशीची परवानगी पोलिसांना मिळाली आहे. यावेळी या मुलाचे पालक किंवा वकील उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे चौकशीवेळी कोण उपस्थित राहणार, याचीही चर्चा आहे. या मुलाची बाल निरीक्षण गृहातील कोठडी संपत असल्याने, त्यापूर्वीच ही चौकशी करण्यात येईल.