फास्ट टॅगद्वारे महागड्या कार चोरट्यांचा शोध; दोघे चोरटे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 09:02 PM2022-06-20T21:02:26+5:302022-06-20T21:13:37+5:30

चोरीच्या हायटेक फंडा, अनिलकुमार (रा. बंगलोर, कर्नाटक) आणि गोपीनाथ जी (रा. चेन्नई, तामिळनाडु) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Pune police arrest two car thieves | फास्ट टॅगद्वारे महागड्या कार चोरट्यांचा शोध; दोघे चोरटे जाळ्यात

फास्ट टॅगद्वारे महागड्या कार चोरट्यांचा शोध; दोघे चोरटे जाळ्यात

Next

पुणे : पुण्यातून महागडी कार चोरुन नेली. पण तिचा कात्रज घाटाच्या पुढे तपास लागला नाही. खेड शिवापूर व आणेवाडी टोलनाक्यावरही ती आढळली नाही. चोरट्यांनी तिचे या दोन्ही टोल नाक्यादरम्यान नंबरप्लेट बदलल्याने त्याचा तपास लागू शकत नव्हता. पण, चोरटे एखादी तरी चूक करतातच. त्याप्रमाणे या चोरट्यांनी एक चूक केली. त्याद्वारे पोलिसांनी तब्बल ६० ते ७० हजार गाडयांचे फुटेज तपासले. त्यातून चोरट्यांनी वापरलेला कॉमन फास्ट टॅग शोधून काढला व त्यावरुन चोरट्यांना महागड्या गाडीसह जेरबंद केले. फास्ट टॅग वरुन चोरी उघडकीस आणण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

अनिलकुमार (रा. बंगलोर, कर्नाटक) आणि गोपीनाथ जी (रा. चेन्नई, तामिळनाडु) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पर्वती येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारे सुरेंद्र वीर यांची महागडी कार ५ जून रोजी चोरीला गेली होती. दत्तवाडी पोलिसांनी या गाडीचे २०० ते २५० अस्पष्ट फुटेज पर्वतीपासून सातार्यापर्यंत तपासले. या गाडीबरोबरच मागोमाग एक दुसरी कार कायम दिसत होती. मात्र, टोलनाक्यावर ही चोरलेली कार दिसून आली नाही. तेव्हा पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व प्रमोद भोसले यांनी खेड शिवापूर व आणेवाडी येथे टॅग झालेला पण, वेगवेगळा गाडी नंबर असलेला कॉमन टॅग ६० ते ७० हजार गाड्यांमधून शोधून काढला. टोलनाक्यावर हा फास्ट टॅग पुन्हा आला तर सर्तक करण्यास सांगितले. त्यानुसार आणेवाडी येथील टोल नाक्यावर हा फास्ट टॅग वापरला गेल्याचे पोलिसांना १४ जून रोजी सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तामिळनाडुमधून २० लाख ५७ हजार रुपयांची कार जप्त करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंग पाटील, प्रशांत शिंदे, नवनाथ भोसले, किशोर वळे, अमित चिव्हे, अमोल दबडे यांनी केली आहे.

चोरटे हायटेक
अनिल कुमार हा उच्च शिक्षित असून गाडीच्या तांत्रिक ज्ञानाची त्यांना पुरेपुर माहिती आहे. अनिलकुमार हा डिजिटल चावी बनविणारे क्लोन डिव्हाईस (मशीन) व प्रोग्रॅमिंग करुन तो महागड्या गाड्या चोरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर कोईम्बंतूरमध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत. गाडी चोरल्यानंतर ते काही अंतर गेल्यावर तिची नंबरप्लेट बदलत असत. दोन टोलनाक्यांच्या दरम्यान पुन्हा नंबर प्लेट बदलत.

१५ सभांव्य चोऱ्या टळल्या

या दोघांना पकडल्यावर त्यांच्याकडे पुण्यातील विविध भागातील १५ महागड्या गाड्यांचे नंबर व पत्ता मिळाले. आरोपी यापूर्वी चार ते पाच वेळा पुण्यात येऊन रेकी करुन गेले होते. प्रत्येक वेळी एक गाडी चोरुन नेण्याचे त्यांचे नियोजन होते. दत्तवाडी पोलिसांनी त्यांना अगोदरच पकडल्याने पुढील १५ महागड्या गाड्यांची चोरी टळली.

Web Title: Pune police arrest two car thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे