निष्क्रिय बँक खात्याचा डाटा मिळवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद, पुणे पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:54 AM2021-03-17T02:54:14+5:302021-03-17T06:59:47+5:30
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डाटा मिळविला.
पुणे : बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्क्रिय) खात्यांचा डाटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी सायबर पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. भाजपाच्या चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
रोहन रवींद्र मंकणी (३७, रा. सहकारनगर), रवींद्र माशाळकर (३४, रा. लातूर), मुकेश मोरे (३७, रा. येरवडा), राजशेखर ममीडा (३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (४५, रा. वाशीम, सध्या औरंगाबाद), आत्माराम कदम (३४, रा. मुलुंड, मुंबई), वरुण वर्मा (३७, रा. मेरठ, उत्तरप्रदेश) आणि विकासचंद यादव (२५, रा. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (५४, रा. आनंदनगर, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (४०, रा. वडगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डाटा मिळविला. या सर्व बँक खात्यात जवळपास २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. गेले काही दिवस सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाइट्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर आणखी पाच पुरुष व एक महिला आली. पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्लक असलेल्या बँक खात्यांचा डाटा मिळाला. रोहन रवींद्र मंकणी याने हा डाटा घेऊन सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या सर्वांकडून ११ मोबाइल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.