स्वस्तात मोबाईल विकणारा निघाला चोर : सापडले २४ हँडसेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 07:27 PM2018-07-05T19:27:58+5:302018-07-05T19:29:38+5:30
सार्वजनिक ठिकाणी घाईगर्दीच्यावेळी मोबाईल चोरून ते स्वस्तात विकणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे असलेले तब्बल चोवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पुणे :सार्वजनिक ठिकाणी घाईगर्दीच्यावेळी मोबाईल चोरून ते स्वस्तात विकणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे असलेले तब्बल चोवीस मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
नागनाथ रामभाऊ सुतवणे असे या आरोपीचे नाव आहे. पोलिस हवालदार अशोक माने आणि प्रकाश लोखंडे यांना गुप्त बातमीदाराने स्वारगेट बसस्टॉपला एक व्यक्ती स्वस्तात मोबाईल विकत असल्याची खबर दिली. त्यांनी त्याठिकाणी अन्य पोलीस स्टाफसह जाऊन संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडे चोवीस मोबाईल हँडसेट सापडले. यामध्ये झोलो, स्पाईस, इंटेक्स, मॅक्रोमॅक्स, डिस्को, एलवायएफ, सॅमसंग, झिओक्स, नोकिया, कार्बन, लावा, ओप्पो, आय कॉल, ओपल कंपनीच्या एकूण १ लाख ९ हजार ५०० रुपये किंमतीच्या फोनचा समावेश आहे.
स्वारगेट बसस्टॅन्ड किंवा परिसरातून कोणाचे मोबाईल फोन चोरी गेले असल्यास स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस नितीन भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केली.