बंद दाराआड दडलंय काय?; पुणे पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं मोठं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 10:17 PM2022-06-11T22:17:53+5:302022-06-11T22:18:04+5:30

आप्पा कुंभार याचे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता.

Pune Police took action against illegal trade | बंद दाराआड दडलंय काय?; पुणे पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं मोठं साम्राज्य

बंद दाराआड दडलंय काय?; पुणे पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं मोठं साम्राज्य

Next

पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध धंद्याविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईने अप्पा कुंभार याने नवनवीन युक्त्या शोधून आपला अड्डा सुरू ठेवला होता. मंगळवार पेठेतील या अड्ड्यावर शनिवारी पहाटे पावणेतीन वाजता छापा टाकून पोलिसांनी ३६ जणांवर कारवाई केली. तेव्हा या मटक्याच्या अड्ड्याचे एक एक कारनामे समोर आले.

पोलिसांनी अड्डा चालक वीरेश भीमाशंकर कुंभार (वय ३९, रा. मिथिला अपार्टमेंट, दशभुजा गणपती मागे, कर्वे रोड) याच्यासह अड्ड्यावरील ९ कामगार, २० मटका खेळणाऱ्यांना अटक केली आहे. भीमाशंकर ऊर्फ आप्पा इरप्पा कुंभार (६८, रा. नाना पेठ) याच्यासह पाचजण पळून गेले आहेत. या कारवाईत एक लाख ११ हजार १०० रुपयांची रोकड, एक लाख ४७ हजारांचे २९ मोबाईल, दोन लाख ४० हजार रुपयांच्या ६ दुचाकी असा एकूण ६ लाख ८ हजार २५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

आप्पा कुंभार याचे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. तरीही त्याचा जुगाराचा क्लब जबरदस्त फाॅर्मात सुरू होता. रात्री साडेअकरा ते पहाटे चारपर्यंत हा क्लब सुरू असायचा.

आलीशान क्लब

या ठिकाणी तळघरात दोन हजार स्क्वेअर फुटांमध्ये क्लब सुरू होता. एअर कंडिशन्स, पंखे, इन्व्हर्टर, जुगार खेळायला मखमलीचे टेबल्स, लाेखंडी स्टुल्स होते. खेळींना क्लबवर आणायला व सोडायला शुटर्समार्फत मोटारसायकल, स्कूटरची व्यवस्था होती. खेळणाऱ्यांसाठी खाद्यपदार्थांची सोयही होती.

नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे

क्लबच्या चारही दिशांना, इमारतीच्या आजूबाजूला, नागझरीकडेही सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्याचे कनेक्शन आप्पा कुंभारच्या मोबाईल व घरामध्ये दिसत असे. त्यावरून तो परिसरात कोणी अनोळखी दिसले तर तातडीने क्लबमधील लोकांना सावध करीत असे. क्लबमधील लाईट बंद करून आतील लोक नागझरीच्या मार्गाने बाहेर काढले जात असे. क्लब बंद असल्याचे दाखविण्यासाठी त्याने मेन गेटला मोठे कुलूपही लावले होते. फक्त ओळखीच्या व नेहमी खेळायला येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता.

 

पोलिसांवरही नजर
सामाजिक सुरक्षा विभागाने शहरात सर्वत्र कारवाई सुरु केल्याने त्याने सामाजिक सुरक्षा विभागाच्या गाड्या, लोकांची माहिती काढली होती. पोलिसांची धाड पडलीच तर जास्त रक्कम सापडू नये, म्हणून त्याचा मुलगा दर तासाला गोळा झालेली रक्कम बाहेर घेऊन जात होता. यावर मात करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सामाजिक सुरक्षा विभागाच्या मदतीला परिविक्षाधीन पोलीस अधिकार्यांचे पथक दिले.

४ तास नागझरीतून वॉच

गेली ३ आठवडे या क्लबची पोलीस रेकी करत होते. या क्लबवर परिविक्षाधीन पोलीस अधिकार्यांनी शुक्रवारी रात्री अकरापासून नागझरीतील पाण्याजवळ थांबून वॉच ठेवण्यास सुरुवात केली. आत किती जण जात आहे, हे पाहिल्यानंतर पहाटे पावणेतीन वाजता तीनही बाजूने या क्लबवर छापा घातला. क्लबमधून पळून जाण्यासाठी ३ मार्ग असल्याने त्याचा फायदा घेऊन ५ जण पळून गेले. तरीही

पोलिसांच्या हाती तब्बल ३० जण लागले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, महिला हवालदार मोहिते, कांबळे यांच्या पथकाने केली. विशेष म्हणजे या कारवाईसाठी परीविक्षाधिन पोलीस उप निरीक्षकांचा महत्वाचा सहभाग होता.

Web Title: Pune Police took action against illegal trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.