ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 05:59 AM2024-05-28T05:59:11+5:302024-05-28T06:00:22+5:30

डॉ. अजय तावरे व डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक; तीन दिवसांची कोठडी

Pune Porsche Car Accident Sassoon doctors exchange accused blood samples for 3 lakhs Both doctors arrested | ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक

ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली असून, कारचालक बाळाचा रक्ताचे नमुनेच बदलल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयातील  फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर यांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.  त्यांना न्यायालयाने ३ दिवसांची कोठडी सुनावली.

आयुक्तांचा संशय ठरला खरा

अपघातानंतर नियमानुसार बाळाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, हाय प्रोफाइल केस असल्याने या प्रकरणात कोणतीही शंका राहू नये, यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सांगण्यावरून बाळाचे दुसऱ्यांदा नमुने घेण्यात आले. मात्र, हे नमुने ‘ससून’ऐवजी खासगी प्रयोगशाळेत डीएनए रिपोर्टसाठी पाठवले होते. रविवारी पोलिसांकडे  दोन्ही अहवाल आले. त्यात ‘ससून’च्या डॉक्टरांनी ३ लाख रुपयांच्या बदल्यात नमुनेच बदलल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस आयुक्त म्हणाले...

डॉ. तावरे व डॉ. हाळनोर यांनी ‘बाळा’चे रक्ताचे नमुने कचऱ्यात टाकून दुसरेच नमुने तपासासाठी पाठवले. आम्हाला रक्त तपासणी अहवालातील फेरफार लक्षात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

बाळाऐवजी रक्त देणारा पोलिसांच्या रडारवर

पोर्शे अपघात प्रकरणातील बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसरे रक्त घेऊन बाळाच्या रक्ताचा पुरावा नष्ट करणाऱ्या २ डॉक्टरसह एका शिपायाला न्यायालयाने गुरूवार (ता. ३०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिर्हाईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याचा शोध घेण्यासह गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी ती मान्य करत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

वैद्यकीय शिक्षण विभागाची समिती करणार चाैकशी

मुंबई : पोर्शे अपघात प्रकरणी डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे या डॉक्टरांना आरोपीच्या रक्ताचे नमूने बदलल्याप्रकरणी अटक झाल्याच्या घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने जे. जे. रुग्णालय अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

आयुक्त राजीव निवतकर यांनी सोमवारी हे आदेश काढले. समितीत जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जे. जे. न्यायवैद्यक विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांचा समावेश आहे.

आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती अधीक्षकपदासाठी डॉ. तावरेंची शिफारस

पुणे : पोर्शे अपघात प्रकरणातील बाळाच्या रक्ताचे सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉ. अजय तावरेला अटक झाली. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्याला ससून रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्त करण्याची शिफारस आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. त्यावरून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. तावरे यांना अधीक्षकपद बहाल केले होते. डॉ. तावरे याच्याकडे २०१४ ते मार्च २०२२ पर्यंत ससूनच्या अधीक्षकपदाची धुरा होती. रूबी हॉल क्लिनिकच्या किडनी प्रत्यारोपण रॅकेट उघडकीस आले. त्यावेळी ससून प्रत्यारोपण समन्वय समितीचा अध्यक्ष असलेल्या डॉ. तावरेचे अधीक्षकपद काढले. पुन्हा हे पद मिळवण्यासाठी त्याने आमदार सुनील टिंगरे यांचे शिफारसपत्र २६ डिसेंबर २०२३ ला घेतले. त्यावरून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यास वैद्यकीय अधीक्षक पदावर बसवा, अशी लेखी टिप्पणी केली होती.

शिफारस पत्रात नेमके काय म्हटले?

डॉ. अजय तावरे हे माझ्या परिचयाचे ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी कोविड काळात उत्तम कर्तव्य पार पाडले. डॉ. तावरे वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत उचित कार्यवाही व्हावी, अशी विनंती आमदार टिंगरे यांनी केली होती.

Web Title: Pune Porsche Car Accident Sassoon doctors exchange accused blood samples for 3 lakhs Both doctors arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.