बाप-लेकाची फुटेजशी छेडछाड; कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलिसांची न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:46 AM2024-05-29T10:46:48+5:302024-05-29T10:50:28+5:30
पाेर्शे अपघात, आमदार टिंगरेंमुळे अजित पवार गट आला अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाळाचे वडिल आणि आजोबांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले. या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता ते सहकार्य करीत नसल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली.
गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणून, अपहरण करून त्याला ताब्यात ठेवल्याबाबत अपघात करणाऱ्या मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल (७७) आणि वडील विशाल अग्रवाल यांना गुन्हे शाखेने अटक केली. सुरेंद्रकुमारची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. तर विशाल याला या गुन्ह्यात सोमवारी रात्री अटक करण्यात आली.
कार जप्त; फोन बाकी- आरोपींनी चालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. त्याच्या फोनबाबत मात्र ते उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केला. दोघांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
सीबीआय चौकशी करा : नाना पटोले
राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे, तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करून लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या, यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. दरम्यान, पुण्याच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, बिल्डर बापाच्या बाळाने पोर्शे गाडी भरधाव चालवत २ तरुण अभियंत्यांचे बळी घेतले. अपघातानंतर लगेच पोलिस ठाण्यात गेलेले आमदार सुनील टिंगरे यांच्यामुळे अजित पवार गट राजकीयदृष्ट्या अडचणीत आला आहे. विधानसभेच्या या जागेसाठी आग्रही असणाऱ्या भाजपचा दावा टिंगरे यांच्या उपस्थितीमुळे आता फिक्स झाला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानसभेच्या सन २०१९च्या निवडणुकीत टिंगरे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत भाजपचे तत्कालीन आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव करून निवडून आले. नंतरच्या फाटाफुटीत आमदार टिंगरे अजित पवार यांच्याबरोबर राहिले. त्यामुळेच आता महायुती कायम राहिली, तर वडगाव शेरी विधानसभेची जागा कोणाला? असा प्रश्न उभा राहिला होता. टिंगरे यांच्या अपघातानंतरच्या पोलिस ठाण्यातील उपस्थितीने तो निकालात निघाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
एक ओळीचा खुलासा
- अजित पवार यांच्यावरही टिंगरे यांच्या पोलिस ठाण्यातील उपस्थितीने शिंतोडे उडाले. ते टिंगरे यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. इतका भीषण अपघात झाल्यानंतर पालकमंत्री असूनही ते तब्बल ८ दिवस पुण्यात आलेच नाहीत.
- टिंगरे लोकप्रतिनिधी असल्यामुळे तिथे गेले, असा एका ओळीचा खुलासा त्यांनी मुंबईतून केला. पुण्यात आल्यावरही त्यांनी अपघातावर फारसे भाष्य केले नाही. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेवर संशयाचे धुके दाटले आहे.
भाजपचा हक्काचा मतदारसंघ- वडगाव शेरी हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे. लोकसभेसाठी या आधी या मतदारसंघातून भाजपला लक्षणीय मताधिक्य मिळाले आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी या मतदारसंघाबाबत फार आग्रही आहेत. अजित पवार गटाबरोबरच्या युतीला स्थानिक स्तरावर मान्यता नाही.