लाचखोरांना पकडण्यात पुणे विभाग आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:28 PM2018-12-31T12:28:14+5:302018-12-31T12:39:25+5:30
एका पाठोपाठ दोन सापळा कारवाईत कोटीच्या कोटी रुपयांची लाच घेतली जात असल्याचे उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे़.
पुणे : राज्यात लाचखोरांना पकडण्यात पुणे विभागाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असून तब्बल २०० सापळा केसेस करुन लाचखोरांवर कारवाई करण्याची धडाडी दाखविली आहे़. २०१७ मध्येही पुणे विभागाने सर्वाधिक १८७ सापळा कारवाया केल्या होत्या़ तर २०१६ मध्ये १८५ सापळा कारवाया केल्या होत्या़.
भूमी अभिलेख उपसंचालकाने एका जमिनीच्या प्रकरणात निकाल दिल्यानंतर काही वेळात १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारताना अॅड़. रोहित शेंडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते़. त्यानंतर शनिवारी मुळशीच्या तहसीलदाराला १ कोटी रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले़. एका पाठोपाठ दोन सापळा कारवाईत कोटीच्या कोटी रुपयांची लाच घेतली जात असल्याचे उघड झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे़. यापूर्वी पुणे विभागाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ११ लाख रुपयांची लाच घेताना याच वर्षी पकडले होते़.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवायाचा धडाका सुरु केल्याने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात लाच घेण्याऐवजी सुट्टीच्या दिवशी तसेच बाहेर रात्री उशिरा पैसे घेण्यास सुरुवात केली़. त्यावर लाचलुचपत ने अगदी सुट्टीच्या दिवशी आणि रात्री उशिराही कारवाया करुन अशा लाचखोरांचा पर्दाफाश केला आहे़.
शिक्षण विभागातील अधिकारी महिलेने सुट्टीच्या दिवशी व त्या संस्थेमध्ये येऊन पैसे घेणार असल्याचे कळविले होते़. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर सापळा रचला व या महिला अधिकाऱ्यांला पकडले़.
पुणे -मुंबई रस्त्यावर वाहनचालकांकडून घाटातून मोठ्या ट्रकला परवानगी देण्यासाठी लाच घेणाऱ्या रस्ता सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यावर भर रस्त्यात पहाटे साडेतीन वाजता खंडाळा येथे कारवाई करुन पकडले़. देशभरातील इतक्या पहाटे केलेली ही बहुदा पहिलीच कारवाई असावी़.
़़़़़़़़
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७७ सापळा कारवाया झाल्या असून त्याखालोखाल सोलापूर ३७, कोल्हापूर ३४, सातारा २९, सांगली २३ सापळा कारवाया करण्यात आल्या आहेत़.
.........
राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत ८८२ सापळा कारवाया केल्या असून त्यात ११६७ जणांना पकडण्यात आले आहे़. २०१७ साली ८६६ सापळा कारवाया करण्यात आल्या असून त्यात ११३३ जणांना पकडण्यात आले होते़. सापळा कारवायांबरोबर राज्यभरात अपसंपदा याचे २२ गुन्हे आणि अन्य भ्रष्टाचाराचे २३ गुन्हे या वर्षभरात दाखल करण्यात आले आहेत़.
लाचखोरीमध्ये महसुल विभाग आघाडीवर असून त्यातील २१५ प्रकरणे उघडकीस आली़. त्यात ३ कोटी ६ लाख १४ हजार १०० रुपयांची लाच स्वीकारली गेली आहे़. त्यात एकूण २७० जणांना पकडण्यात आले आहे़.
पोलिसांविरोधात १९५ लाचखोरीची प्रकरणे दाखल झाली असून त्यात २५८ जणांकडून २४ लाख ६६ हजार ९०० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली होती़. राज्यातील महापालिकांमध्ये ४७ कारवाया करण्यात येऊन त्यात १६ लाख ६८ हजार ५५० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली होती़. नगर रचना विभागात ३ प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली असून त्यात १३ लाख ७५ हजार रुपये ५ जणांकडून पकडण्यात आले़.
राज्यभरात एकूण ८८२ प्रकरणात तब्बल ४ कोटी ४३ लाख ८६ हजार ८७८ रुपयांची लाच घेताना १ हजार १६७ जणांना पकडण्यात आले आहे़.