दुसऱ्या संतोष मानेच्या तावडीतून थोडक्यात वाचले पुणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:16 PM2019-07-25T15:16:07+5:302019-07-25T15:20:42+5:30

काही वर्षांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने जानेवारी २०१२ रोजी अशाच प्रकारे एसटी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकुळ माजवला होता़.

Punekar travel passenger save from accdent same Santosh mane case | दुसऱ्या संतोष मानेच्या तावडीतून थोडक्यात वाचले पुणेकर

दुसऱ्या संतोष मानेच्या तावडीतून थोडक्यात वाचले पुणेकर

Next

पुणे : स्थळ शिवाजीनगर एसटी बसस्थानक, वेळ रात्रीचे पावणेदहा वाजलेले, पुणे उस्मानाबाद शिवशाही बस प्रवाशांनी भरलेली व निघण्याच्या तयारीत होती़. अचानक एक जण बसचालकाच्या जागेवर बसला़. त्याने बस सुरु केली व वेगाने बसस्थानकाच्या बाहेर आणली़. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना काही तरी वेगळे घडत असल्याचे लक्षात आले़ पाहिले तर बस कंडक्टर खालीच होता़. चालकही गणवेशामध्ये नव्हता़. तेव्हा प्रवाशांनी एकच आरडाओरडा सुरु केला़. एकाने पुढे होऊन पाहिले तर चालक दारुच्या नशेत दिसत होता़. त्याने तातडीने बसचे स्टेअरिंग धरुन त्याला बस थांबविण्यास सांगितले़. त्यामुळे तो बस सोडून पळू लागला़. चौकात असलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले़ चौकशी करता त्याची साप्ताहिक सुट्टी असतानाही त्याने दारुच्या नशेत बस चालविली होती़. त्याला वेळीच रोखल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला़. अनेकांना तर संतोष माने याची आठवण झाली़. दुसरा संतोष माने होता होता वाचला़. हा थरार शिवाजीनगर बस डेपो ते शिमला ऑफिस चौक दरम्यान मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता झाला़. अमोल विठ्ठल चोले (वय ३३, रा़ ताडीवाला रोड) असे या बसचालकाचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. याप्रकरणी जिन्नसराव श्रीरंग ओव्हाळ (वय ५७, रा़. सैनिकनगर) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. अमोल चोले हा शिवाजीनगर बस डेपोमध्ये बसचालक असून त्याची बुधवारी साप्ताहिक सुट्टी होती़ त्याला बीडला गावाला जायचे होते़. शिवशाही बस शिवाजीनगर बसस्थानकात उभी होती़. बस घेऊन जात असल्याचे सांगण्यासाठी चालक नियंत्रण कक्षाकडे गेला होता़. कंडक्टरही बसच्या बाहेर थांबले होते़. अशावेळी अमोल याने दारुच्या नशेत बसमध्ये येऊन बस चालू केली व तो ती घेऊन जात होता़. तो साध्या ड्रेसमध्ये असल्याने प्रवाशांच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी बस सिमला ऑफिस चौकात थांबविण्यास भाग पाडले़. पोलिसांनी बस पळवून नेऊन नुकसान केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे़. 
.................
काही वर्षांपूर्वी स्वारगेट बसस्थानकातून संतोष माने या बसचालकाने जानेवारी २०१२ रोजी अशाच प्रकारे एस टी बस पळवून नेऊन सुमारे एक तास शहरात धुमाकुळ माजवला होता़. त्यात त्याने अनेक वाहनांना धडक दिल्याने त्यात ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तर, २७ जण जखमी झाले होते़.


 

Web Title: Punekar travel passenger save from accdent same Santosh mane case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.