वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉस्टेबल अशा ११ जणांना वेतनवाढ रोखण्याची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 07:07 PM2020-08-01T19:07:45+5:302020-08-01T19:09:17+5:30
बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे निरपराध व्यक्तींवर गुन्हा दाखल
पुणे : गुन्ह्याचे गांभीर्य वाढवून पूर्ण चौकशी न करता जबरी चोरी सारखा गंभीर गुन्हा दाखल करणे तसेच तक्रार अर्ज नीट वाचून आरोपीविरुद्ध गुन्हा होतो का हे न तपासताच सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणे अशा दोन प्रकरणात दोन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व काँस्टेबल अशा ११ जणांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी सुनावली आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील डिसेंबर २०१९ मधील एका गुन्ह्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह ७ जणांना ही शिक्षा देण्यात आली आहे़ या प्रकरणात फिर्यादीचा दाखलपात्र जबाब घेऊन वरिष्ठांचे परवानगीने गुन्हा दाखल केल्याचे दिसून येत नाही. यात ३९४ प्रमाणे घटना घडल्याबाबतचे कथन केल्याचे दिसून येत नाही असे असताना त्यात जबरी चोरीचे ३९४ कलम कसे नोंदविण्यात आले याचा काहीही बोध होत नाही. या प्रकरणात नियंत्रण कक्षाकडून आलेल्या कॉलपासून प्रत्येक टप्प्यात हलगर्जीपणा झाल्याचे चौकशी आढळून आल्याने ७ जणांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे.
दुसºया प्रकरणात सप्टेंबर २०१९ मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यातील ३५४ (ए), ५००, ५०६, ५०९ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस नाईक अशा चौघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा गुन्हा दाखल करताना त्या आधी संबंधित महिलेचा तक्रार अर्ज नीट वाचून १ ते ५ आरोपींविरुद्ध गुन्हा होतो का हे न तपासताच सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात फक्त एका आरोपीविरुद्ध सकृत दर्शनी पुरावा दिसतो मात्र इतर २ ते ५ आरोपींविरुद्ध चुकीचा गुन्हा दाखल आहे. बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे निरपराध व्यक्तींवर गुन्हा दाखल झालेला आहे.त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत झाल्याने चौघांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.