चाकूचा धाक दाखवून रेल्वे अधिकाऱ्याला लुबाडणाऱ्या त्रिकूटांना शिक्षा
By सूरज.नाईकपवार | Published: June 13, 2024 09:44 AM2024-06-13T09:44:24+5:302024-06-13T09:49:41+5:30
मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी कार्लो सांतान दा सिल्वा यांनी वरील निवाडा दिला.
मडगाव : गोव्यात एका रेल्वे अधिकाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या त्रिकुटाला न्यायालयाने दोषी ठरवून, तीन महिन्यांची कैद व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. समीर बेपारी ( रा. दक्षिण गोवा, मूळ हुब्बळी धारवाड ) , कासिम कुंदनगौल उर्फ कुंदनगन ( रा. ईश्वर नगर, ओल्ड हुब्बळी, धारवाड) व सादिक नालबंद ( रा. अयोध्या नगर, आंबेडकर कॉलनी, ओल्ड हुब्बळी, फस्ट क्रॉस, धारवाड) अशी आरोपींची नावे आहेत.
मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी कार्लो सांतान दा सिल्वा यांनी वरील निवाडा दिला. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मडगावच्या रेल्वे हॉलिडे होम येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लुबाडणुकीची वरील घटना घडली होती. मूळ केरळ राज्यातील व बेळगाव येथे काम करणारे राज. के.के. या रेल्वे अधिकाऱ्याची गोव्यात बदली झाली होती.
कामावरुन परत येत असताना वाटेत या आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखविला व एक हजार रुपयांसह अन्य ऐवज पळविला होता. पाकिटात असलेला रेल्वे इमर्जन्सी ड्युटी पासही काढून घेतला होता. तसेच, जवळच्या एटीएम केंद्रावर नेऊन त्यांच्या खात्यातील ५ हजार रुपये काढून घेण्यात आले. यानंतर रेल्वे अधिकारी राज के.के. यांनी या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर न्यायालयात आरोपींनी आपला गुन्हा कबुल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.