केवळ निर्भयाच्या गुन्हेगारांना नाही तर समाजातील 'या' दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा - उज्ज्वल निकम
By पूनम अपराज | Published: March 20, 2020 11:55 AM2020-03-20T11:55:03+5:302020-03-20T11:56:53+5:30
आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.
पूनम अपराज
मुंबई - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. ही शिक्षा फक्त या चार गुन्हेगारांना झालेली नाही तर समाजातील दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा आहे अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. फासावर लटवलेल्या चार नराधमांच्या वकिलाने न्यायव्यवस्थेचा जो वेळ वाया घालवला, ते व्यावसायिक गैरवर्तन म्हणून आढळल्यास बार कौंसिलसह न्यायालय देखील त्याचा गंभीरपणे विचार करू शकतं. तसेच चार दोषींनी फाशी लांबविण्यासाठी जो काही कायदेशीर पर्यायांचा फायदा घेतला. त्यामुळे न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवर शंका निर्माण करणारी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. मात्र, अखेर न्याय मिळाला. या दोषींप्रमाणे कोणी कायद्याशी खेळतं किंवा आव्हान देतं ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती सन्मान आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी याचिका कितीवेळा केली पाहिजे यावर विचार होणं गरजेचं आहे. पुनर्विचार याचिकेसाठीही मर्यादा असायला हवी असे देखील निकम पुढे म्हणाले.