Punjab: पंजाब: निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ED कडून अटक; 8 तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:10 AM2022-02-04T09:10:55+5:302022-02-04T09:11:19+5:30
Sand Mining Case: पंजाबमधील निवडणुकीपूर्वी या मुद्द्यावरून राजकारणही तापले आहे. भाच्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर भाजप, सीएम अमरिंदर आणि इतर पक्षांनी सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ईडीने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या भाच्यावर कारवाईचा फास आवळला आहे. भूपिंदर सिंग हनी याला ईडीने अटक केली आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन प्रकरणी पैशांची अफरातफर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली, तसेच त्याची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली.
जालंधरमध्ये ही अटक करण्यात आली. चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनीच्या घरावरही ईडीने दोन आठवड्यांपूर्वी छापा टाकला होता. हनीच्या दोन साथीदारांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. ईडीला तिघांच्या घरातून जप्त झालेल्या रोख रकमेची चौकशी करायची आहे. छाप्यात हनीच्या घरातून सुमारे ७.९ कोटी रुपयांची रोकड सापडली. त्याचवेळी हनीचा सहकारी संदीप कुमार याच्या ठिकाणाहून दोन कोटी रुपये मिळाले.
भूपिंदरसिंग हनी आणि त्याच्या साथीदारांवर बनावट कंपन्या तयार करून मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे आणि अवैध वाळू उत्खननातही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. भूपिंदर सिंग हनी, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असल्याचे ईडीने उघड केले होते. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली. बेकायदेशीर खाण प्रकरणी कुदरतदीप सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनी हे काम करण्यात आले.
पंजाबमधील निवडणुकीपूर्वी या मुद्द्यावरून राजकारणही तापले आहे. भाच्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर भाजप, सीएम अमरिंदर आणि इतर पक्षांनी सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता. चन्नी यांनी या कारवाईला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. तसेच यात भाच्याला गोवण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले होते.
पंजाबमध्ये या महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत.