मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला 23 लाखांचा गंडा; पोलिसांनी केलं आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:57 AM2019-08-08T09:57:54+5:302019-08-08T10:05:53+5:30
आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची एक टीम झारखंडच्या रांची येथे गेली होती.
चंदिगड - पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर यांची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हे शाखेत या प्रकरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीने स्वत:ला बँक मॅनेजर असल्याचं सांगत परनीत कौर यांची फसवणूक केली.
पोलिसांनी बुधवारी सांगितले की, पटियाला काँग्रेस खासदार परनीत कौर यांची फसवणूक झाल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. कौर यांच्या नंबरवर आलेल्या कॉलवरुन पोलिसांनी तपास सुरु केला. या चौकशीत पोलिसांनी झारखंडमधील रांची येथून आरोपीला अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी परनीत कौर संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्ली येथे गेल्या होत्या. तेव्हा त्यांना एक कॉल आला. एका राष्ट्रीयकृत बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करत आरोपीने कौर यांनी तुमचं वेतन जमा करण्यासाठी बँक खात्यासंदर्भातील माहिती घेतली. शिताफीने आरोपीने कौर यांच्याकडून बँक खात्याची माहिती, एटीएम पिन, सीवीसी नंबर आणि ओटीपी जाणून घेतला. त्यानंतर काही वेळात त्यांच्या खात्यातून 23 लाख रुपये काढण्यात आल्याचा एसएमएस कौर यांच्या मोबाईलवर आल्याने त्यांना धक्का बसला.
या प्रकरणाची माहिती खासदार परनीत कौर यांनी पोलिसांनी दिली. पटियाला येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनदीप सिंह सिद्धू यांनी या गुन्ह्याची चौकशी करत आरोपीला अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची एक टीम झारखंडच्या रांची येथे गेली होती.