Punjab Crime News : पंजाबच्या तुरुंगात गँगवॉर; गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तीन आरोपी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 06:49 PM2023-02-26T18:49:47+5:302023-02-26T18:50:36+5:30
Punjab Crime News : पंजाबच्या गोइंदवाल तुरुंगात ही भीषण गँगवॉरची घटना घडली आहे.
Punjab Crime News: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील तीन आरोपींची गोइंदवाल तुरुंगात हत्या करण्यात आली आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपींची एकमेकांशी हाणामारी झाली. या हाणामारीत 3 ते 4 कैदी जखमी झाले. या घटनेत शूटर मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग मोहना यांचा जागीच मृत्यू झाला, तर केशव बठिंडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर मनदीप सिंग तुफानचा तुरुंगात लॉकअपमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याला इतरांनी बेदम मारहाण केली. भांडणानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चकमकीत 3 ते 4 कैदी जखमी झाले आहेत. गँगस्टर मनदीप तुफान जग्गू हा भगवानपुरिया टोळीचा सदस्य होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मनदीप तुफान हा मुसेवाला हत्येचा स्टँडबाय शूटर
सिद्धू मूसवाला खून प्रकरणाच्या दिवशी मनदीप तुफानही घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित होता. रिपोर्टनुसार, गोल्डी ब्रारने मनदीप तुफानसोबत मणी रैयाला स्टँडबायवर ठेवले होते. त्याला जगरूप उर्फ रूपा आणि मनप्रीत मन्नू यांना कव्हर करण्यास सांगितले होते. मनदीप तुफान हा अमृतसरचा रहिवासी होता. पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सने त्याला पकडले, केशवने मुसेवाला शूटर्सची मदत केली आणि त्यांना आश्रय दिला. गुजरातच्या मुंद्रा बंदरातून स्पेशल सेलने त्याला अटक केली.
दोघांवरही लुधियानामध्ये गुन्हा दाखल
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी काही काळापूर्वी लुधियानामध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गँगस्टर मनदीप सिंग तुफान आणि मणी रैया हे संदीप कहलॉनच्या खूप जवळचे आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी गुंड मनदीप सिंग तुफान आणि मणि रैया यांनी त्याच्या घराची 10 दिवस रेकी केली होती. दोन्ही आरोपींनी रेकी करून कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रारला सर्व माहिती दिली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा संपूर्ण कट तिथूनच रचला जात होता.