मंत्र्यांच्या एस्कॉर्ट वाहनावर हल्ला, चार मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी केली अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 04:07 PM2023-06-05T16:07:05+5:302023-06-05T16:07:21+5:30
मंत्र्यांचा ताफा रविदास चौकात येताच आलिशान कारमधून प्रवास करत असलेल्या तरुणांच्या टोळक्याने मंत्र्यांच्या एस्कॉर्ट वाहनाला ओव्हरटेक केली आणि मारहाण केली.
पंजाबमधील मंत्री बलकार सिंग यांच्या सुरक्षा एस्कॉर्ट वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जालंधर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. काल रात्री एक वाजता मंत्री आपल्या पत्नीसह एका कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडली. मंत्र्यांचा ताफा रविदास चौकात येताच आलिशान कारमधून प्रवास करत असलेल्या तरुणांच्या टोळक्याने मंत्र्यांच्या एस्कॉर्ट वाहनाला ओव्हरटेक केली आणि मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांनी वाहनातील बंदूकधाऱ्यांना शिवीगाळ केली आणि मद्यधुंद अवस्थेत वाहनावर विटाही फेकल्या. तसेच रस्त्यावर गुंडगिरी केली. घटनेच्या वेळी मंत्र्यांची गाडी घटनास्थळी नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, तरुण शांत झाल्यानंतर आणि समजूत काढल्यानंतर मंत्र्यांचे सुरक्षा वाहन त्यांच्या घराकडे निघाले. मात्र, तुरुणांचा ग्रुप इथेच थांबला नाही. नंतर त्यांनी मंत्र्यांचे घर गाठून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांचे पथकही मंत्र्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी हल्लेखोरांना पकडले. चौघांविरुद्ध भादंवि कलम 353 आणि 186 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या वाहनावर हल्ला झाला नसून सुरक्षा रक्षकांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. हे एस्कॉर्ट वाहन होते, त्यामुळे ओव्हरटेकिंगसाठी तरुणांमध्ये हाणामारी झाली.
पोलीस या प्रकरणाचा करत आहेत तपास
एडीसीपी आदित्य यांनी सांगितले की, हे एक रोड रेजचे प्रकरण आहे. मंत्री आणि त्यांच्या वाहनात कोणतीही छेडछाड करण्यात आली नाही. मारामारी एस्कॉर्ट वाहनाची होती आणि मंत्री आणि त्यांचे कुटुंबीयही घटनास्थळी नव्हते. दोघांपैकी एक तरुण वस्तीवर पोहोचला, मात्र चौघांनाही राउंडअप करून पकडण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.