पंजाबचा अतिरेकी मुंबईत जाळ्यात; राज्य दहशतवादविरोधी पथकाची मालाडमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 07:03 AM2022-10-14T07:03:49+5:302022-10-14T07:03:59+5:30
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब येथील रहिवासी असलेला चरतसिंग हा पोलीस आणि तपास यंत्रणांच्या अभिलेखावरील अतिरेकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारागृहातून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर साथीदारांच्या मदतीने पंजाब इंटेलिजन्स कार्यालयावर राॅकेट ग्रेनेडने हल्ला करणाऱ्या एका कुख्यात अतिरेक्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून अटक केली आहे. चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग कारीसिंग उर्फ करज सिंग (३०) असे या अतिरेक्याचे नाव असून त्याच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब येथील रहिवासी असलेला चरतसिंग हा पोलीस आणि तपास यंत्रणांच्या अभिलेखावरील अतिरेकी आहे. मार्च महिन्यात तो पंजाबच्या कपूरथला कारागृहातून दोन महिन्याच्या पॅरोल रजेवर बाहेर आला होता. त्यानंतर ९ मे रोजी चरतसिंग याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पंजाबच्या मोहाली येथे असलेल्या इंटेलिजन्स कार्यालयावर राॅकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो पसार झाला. अखेर चरतसिंग मालाड परिसरात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. याच माहितीच्या आधारे एटीएसने सापळा रचून चरतसिंग याला अटक केली.
चरतसिंग कॅनडास्थित अतिरेकी लकबीरसिंग लांडा याच्या संपर्कात असल्याची माहिती राज्य एटीएसने केलेल्या चाैकशीत समोर आली आहे.