गॅंगस्टर दीपक टीनूच्या गर्लफ्रेन्डला अटक, मालदीवला पळून जाणार इतक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:49 AM2022-10-10T10:49:10+5:302022-10-10T10:52:54+5:30
Crime News : पंजाब पोलिसांनी दावा केला आहे की, पकडण्यात आलेल्या तरूणीनेच गॅंगस्टर टीनूला पळून जाण्यास मदत केली होती.
Crime News : लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य गॅंगस्टर दीपर कुमार उर्फ टीनू पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आता पंजाब पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी टीनूच्या गर्लफ्रेन्डला मुंबई एअरपोर्टवरून अटक केली आहे. ती मुंबईहून मालदीवला पळून जात असताना तिला अटक केली गेली.
पंजाब पोलिसांनी दावा केला आहे की, पकडण्यात आलेल्या तरूणीनेच गॅंगस्टर टीनूला पळून जाण्यास मदत केली होती. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. पण तो भारतात आहे की, परदेशात हे पोलिसांनी सांगितलं नाही.
दरम्यान 1 ऑक्टोबरला गॅंगस्टर दीपक कुमार उर्फ टीनू चौथ्यांदा पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. टीनू हा लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. सिद्धू मूसेवाला हत्येबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस त्याला रिमांडवर घेऊन जात होते. मूसेवालाच्या हत्येच्या प्लानिंगचा शेवटचा कॉन्फरन्स कॉल लॉरेन्स आणि टीनू यांच्यात 27 मे रोजी झाला होता. 29 मे रोजी सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली होती.
गॅंगस्टर टीनूवर 34 पेक्षा जास्त केसेस आहेत. त्याच्यावर पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्लीसहीत वेगवेगळ्या राज्यात 34 34 पेक्षा जास्त केसेस आहेत. यात हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार जवळ ठेवणे आणि खंडनी अशा केसेस आहेत. ही खरंच आश्चर्याची बाब आहे की, टीनू 4 वेळा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला.