Punjab Shiv Sena leader Murder: पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची टार्गेट किलिंग, 5 गोळ्या झाडल्या; 'या' संघटनेने घेतली जबाबदारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:59 PM2022-11-04T18:59:02+5:302022-11-04T18:59:36+5:30

मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंदिराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसेना नेत्यावर भररस्त्यात गोळ्या झाडल्या.

Punjab Shiv Sena leader Murder: Target killing of Shiv Sena leader Sudhir Suri in Punjab Amritsar, 5 bullets fired | Punjab Shiv Sena leader Murder: पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची टार्गेट किलिंग, 5 गोळ्या झाडल्या; 'या' संघटनेने घेतली जबाबदारी...

Punjab Shiv Sena leader Murder: पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची टार्गेट किलिंग, 5 गोळ्या झाडल्या; 'या' संघटनेने घेतली जबाबदारी...

googlenewsNext

Sudhir Suri killing in Amritsar: पाकिस्तानच्या इशाऱ्यावर सुरू असलेल्या काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या घटना शांत झालेल्या नाहीत, यातच पंजाबमध्येही अशा घटना घडत आहेत. अमृतसरमध्ये मूर्तींची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंदिराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या सुधीर सुरी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुरीच्या सुरक्षा रक्षकांनीही हवेत गोळीबार केला, मात्र हल्लेखोरांनी संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला. एका आरोपीला परवानाधारक शस्त्रासह पकडण्यात आले असून, पोलीस या घटनेचा अनेक अँगलने तपास करत आहेत.

जमावासमोर गोळ्या झाडल्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते सुधीर सुरी शुक्रवारी संध्याकाळी अमृतसरमधील मजिठा रोडवरील गोपाल मंदिराजवळ मूर्तींच्या विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. सुरीच्या सुरक्षा रक्षकांनीही बचावासाठी हवेत गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार होताच घटनास्थळी गोंधळ उडाला, त्याचा फायदा घेत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. शिवसेना नेत्याला गंभीर अवस्थेत फोर्टिस एस्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.

समर्थकांनी वाहनांची तोडफोड केली
सुधीर सुरी यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे समर्थक संतप्त झाले. मंदिराभोवती उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड करून पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समज देऊन शांत केले. पोलिसांनी समर्थकांना कारवाईचे आश्वासन देत शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या भागात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांना सुगावा लागला.

एक आरोपी पकडला, शस्त्रेही जप्त
पोलिस आयुक्त अरुण पाल सिंह यांनी सांगितले की, हल्ल्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप सिंग असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून घटनेत वापरलेले परवाना शस्त्र जप्त करण्यात आले आहे. एक हल्लेखोर अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर 'जस्टिस लीग इंडिया' नावाच्या अज्ञात संघटनेने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली आहे. पंजाबमधील आरएसएस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना संपवणे सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

सुधीर सुरी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर सुरी हे व्यवसायाने ट्रान्सपोर्टर होते. पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांविरुद्ध ते आवाज उठवत होते. बर्‍याच दिवसांपासून सुरी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, त्यामुळे सरकारने त्यांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांचे 8 कर्मचारी ठेवले होते. पण ते जवानही त्यांना वाचवू शकले नाहीत. 

Web Title: Punjab Shiv Sena leader Murder: Target killing of Shiv Sena leader Sudhir Suri in Punjab Amritsar, 5 bullets fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.