ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकांना ‘क्विक सपोर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:40 AM2020-01-10T01:40:59+5:302020-01-10T01:41:10+5:30

पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली वाढत्या फसवणुकीच्या तक्रारी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी ‘अर्जंट फ्रॉड’(पेटीएम) नावाचा ग्रुप बनवला आहे.

'Quick Support' to Paytm Holders Trapped in a Network of Thugs | ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकांना ‘क्विक सपोर्ट’

ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकांना ‘क्विक सपोर्ट’

Next

मनीषा म्हात्रे 
मुंबई : पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली वाढत्या फसवणुकीच्या तक्रारी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी ‘अर्जंट फ्रॉड’(पेटीएम) नावाचा ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये यूपीआय हेड, पेटीएम सायबर सेल, मुंबईसह राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे. ठगाच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने तासाभरात पोलिसांशी संपर्क साधताच या ‘अ‍ॅप’द्वारे त्यांचे पैसे वाचविण्यास मदत होत आहे.
‘‘साहेब, मदत करा!’’ म्हणत धापा टाकतच अंधेरीच्या प्रियांशू इंजिनीअर या व्यावसायिक तरुणाने गुरुवारी वृद्ध वडिलांसोबत घाटकोपर पोलीस ठाण्यातील सायबर सेल गाठले. ‘केवायसी न केल्याने पेटीएम पुढल्या २४ तासांत बंद होईल. केवायसीसाठी खाली नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.’ असा लघुसंदेश प्राप्त झाला. तो पाहताच कोणतीही खातरजमा न करता प्रियांशूने लघुसंदेशातील नमूद क्रमांकावर संपर्क साधला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना ‘क्विक सपोर्ट’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली होती. सायबर सेलमध्ये कार्यरत असलेले पोलीस अंमलदार संतोष गीध यांनी तरुणाकडे चौकशी करीत बसण्यापेक्षा तत्काळ त्याचा तपशील ‘अर्जंट फ्रॉड’(पेटीएम)’ या ग्रुपमध्ये टाकला. काही क्षणांतच त्याचे खात्यातील २० हजार रुपये वाचले.
सरासरी एका पोलीस ठाण्यात अशा स्वरूपात ६ ते ७ तक्रारी येत आहेत. गीध यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठग मंडळी केवायसीच्या नावाखाली ‘क्विक सपोर्ट’ अ‍ॅप अथवा ‘अ‍ॅमी अ‍ॅडमिन’ नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करताच तुमच्या मोबाइलवर त्यांचा कंट्रोल येतो. त्यानुसार, तुमच्या पेटीएम खात्यातील तपशील चोरून ही मंडळी परस्पर पैसे वळते करतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सतर्क होत अशा टोळ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. आपली कुठलीही गोपनीय माहिती शेअर करू नये. शिवाय quicksuport आणि ammyyadmin  या दोन अ‍ॅपद्वारे फसवणूक होत आहे.
>बँकांचा निष्काळजीपणा : अनेक बँकांच्या निष्काळजीपणामुळे हे गुन्हे वाढत असल्याचेही सायबर पोलिसांच्या निरीक्षणातून समोर येत आहे. कुठलीही खातरजमा न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे खाते उघडण्यात येत आहे. केवायसीबाबतही त्यांचा ढिसाळपणा दिसून येत असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
> ‘अर्जंट फ्रॉड’ पेटीएम असे करते काम
२० एप्रिल २०१८ रोजी हा ग्रुप तयार करण्यात आला. यात, यूपीआय हेडसह पेटीएम सायबर सेलचे पदाधिकारी आहेत. मुंबईसह राज्यभरातील पोलिसांचा समावेश आहे. यात ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकाचा ट्रान्झेक्शन आयडी आणि डेबिट कार्डचे पहिले ६ आणि शेवटचे ४ अंक टाकण्यात येतात. त्यानुसार ते पैसे कुठून कुठल्या खात्यात गेले याची माहिती मिळते.
त्यानंतर पेटीएममध्ये पैसे असल्याचे समजताच ते तत्काळ ब्लॉक करण्यात येतात. जर ते अन्य खात्यात गेल्याचे समजले तर संबंधित बँकेला ‘डेबिट फ्रिज’ करण्याबाबत मेल धाडण्यात येतो. जेणेकरून ती व्यक्ती पैसे काढू शकत नाही.
>कॉल नॉयडातून, पैसे पश्चिम बंगालमध्ये... फसवे कॉल हे नॉयडातून येत असल्याचे तर ठगीची रक्कम पश्चिम बंगालच्या खात्यात जात असल्याचे प्रमाण जास्त असल्याची माहितीही पोलीस कारवायांमधून समोर येत आहे.

Web Title: 'Quick Support' to Paytm Holders Trapped in a Network of Thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Paytmपे-टीएम