गांंजा विक्रीचे सावंतवाडीत रॅकेट कार्यरत; दोन दिवसात चार किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 08:11 PM2021-07-24T20:11:16+5:302021-07-24T20:34:00+5:30
Crime news Sawantwadi: सिंधुदुर्ग जिल्हयात गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अनेक दिवसापासून होता. त्या दृष्टीने पोलिस शोध घेत होते.
सावंतवाडी : सावंतवाडीत गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असून, गेल्या दोन दिवसात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करून चार किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. एक जण फरार होण्यात यशस्वी झाला असून,पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गांजा विक्री करणारे टोळके सावंतवाडीतील असून, येथून तो संपूर्ण जिल्हयात पुरवठा केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र हा गांजा कोठून आला याचा शोध पोलिस घेत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हयात गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अनेक दिवसापासून होता. त्या दृष्टीने पोलिस शोध घेत होते. मात्र, गुरूवारी पोलिसांना आकेरी घाटीमध्ये दुचाकी वरून गांजा विक्री करण्यासाठी जाणारे दोघे युवक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला सापडले. यात मयूरेश गुरूनाथ कांडकर (रा.सालईवाडा, सावंतवाडी) आशिष अशोक कुलकर्णी(रा. भटवाडी सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना ३६७ ग्रॅम ११ हजार रूपये किमतीचा गांंजा आढळून आला. तसेच त्यांची दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
या आरोपीकडून पोलिसांनी कसून तपास केला असता अतुल गवस नामक युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत पुन्हा बेग नामक युवकांचे नाव समोर आले असून, त्यांच्या घरात छापा टाकून कुडाळ पोलिसांनी ३ किलो गांजा जप्त केला आहे. मात्र, संशयित आरोपी रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र गांजा विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्हयात कार्यरत असल्याचा संशय पोलीसांना असून पोलिसांनी त्या दृष्टीने आपला तपास सुरू केला आहे. त्यामुळे आता पर्यंत तब्बल चार किलो एवढा गांजा छापेमारीत पोलिसांना सापडला आहे.
हा सर्व गांजा सावंतवाडीत कोठून येतो याचा पोलीस शोेध घेत असून, या गांजा विक्रीचे केंद्र सावंतवाडी शहरात काही ठिकाणी असून, येथूनच तो जिल्हयात वेगवेगळ्या शहरात पुरवठा केला जात आहे. त्या साठी वेगवेगळी माणसे ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे रॅकेट मोठे असून,सध्यातरी पोलिसांना चार नावे पुढे आली आहेत.पडद्यामागे अनेक जण असल्याचा संशय पोलिसांना आहे.