राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान व फराळे सरपंच संदीप डवर साडेपाच लाखाची लाच घेताना जाळयात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:30 PM2022-01-09T17:30:40+5:302022-01-10T10:59:16+5:30
क्रशर विरोधातील तक्रार अर्ज निर्गत करण्यासाठी सरपंचाकरवी साडेपाच लाख रुपयांची लाच स्विकारणार्या प्रांतासह सरपंचास जेरबंद केले.
कोल्हापूर : क्रशर विरोधातील तक्रार अर्ज निकालात काढण्यासाठी सरपंचाकरवी साडेपाच लाखांची लाच घेताना राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान (रा. न्यू पॅलेसनजीक, कोल्हापूर. मूळ गाव- बीड) याच्यासह फराळे गावचा सरपंच संदीप जयवंत डवर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडून अटक केली.
अकरा लाखाची लाचेची मागणी होती. कोल्हापुरात कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कागल-राधानगरी प्रांत कार्यालयात रविवारी सुटी दिवशी दुपारी केली. राधानगरी प्रांताधिकारी व फराळे (ता. राधानगरी) गावचे सरपंच लाचप्रकरणी गजाआड झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली.
राधानगरी तालुक्यातील फराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगाचीवाडी येथे तक्रारदाराचे सिलीका वाळू वाशींग प्लॉंट क्रशर आहे. क्रशरच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत, घरांना तडे गेलेत असे कारण पुढे करुन राधानगरी प्रात प्रसेनजीत प्रधान व फराळे गावचे सरपंच संदीप डवर यांनी प्लॉटला भेट दिली. तो प्लॉंट बंद करावा अशी नोटीस सरपंच डवर यांनी बजावली. सरपंचांच्या नोटिसी संदर्भातून राधानगरी प्रांताधिकारी प्रधान यांनी संबंधित प्लॉटमालकास आणखी दोन नोटिसा बजावल्या.
त्यानंतर तक्रारदार प्लॉटमालकाने प्रांताधिकारी प्रधान यांची भेट घेतली. प्रांतानी त्यांना सरपंचाची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार सरपंचांनी भेटीत, नोटीस रद्द करण्यासाठी प्रातांना १० लाख व आपल्याला दरमहा एक लाख रुपयेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी पडताळणी केली.
त्यात तक्रारदार प्राताधिकारी प्रधान यांना त्यांच्या न्यू पॅलेस परिसरातील वींड गेट अपार्टमेंटमधील निवासस्थानी भेटले, सरपंचांचा निरोप सांगितला, तशी प्रांतानी त्यास संमती दिली. त्यानंतर दुपारी दोन वाजता मुख्य प्रशासकिय इमारतीच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सरपंचाच्या मोटारीत तक्रारदाराकडून लाचेचे ५ लाख रुपये प्राताधिकारीसाठी व स्वता:साठी ५० हजाराची रक्कम घेताना सरपंच संदीप डवर यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्राताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना त्यांच्या राधानगरी प्रात कार्यालयात अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन कुंभार, हे. कॉ. शरद पोरे, अजय चव्हाण, मयूर देसाई, रुपेश माने, अमर भोसले, नवनाथ कदम, विकास माने, सुरज अपराध यांनी सापळा रचून केली.
सुट्टी दिवशी साहेब ‘लाचे’साठी कार्यालयात
रविवार साप्ताहिक सुट्टी असतानाही प्राताधिकारी प्रधान हे दिवसभर मुख्य प्रशासकिय इमारतीतील राधानगरी कागल-राधानगरी प्रात कार्यालयात बसून होते. कार्यालयाच्या आवारात हे सरपंचाकरवी लाच घेण्याचे षडयंत्र सुरु असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ते उधळले.
सरपंचांची अलीशन मोटार जप्त
सरपंच हे पद सेवेसाठी असते, पण त्याचा फराळे गावच्या सरपंचाचा रुबाब हा मोठाच होता. कारवाई झाल्यानंतर त्यांची अलीशान पांढरी मोटार पथकाने जप्त केली.
जिल्ह्यात दुसरा सरपंच गजाआड
लाचेतील दहा लाख प्रांतांना व दर महा एक लाख रुपये लाच सरपंचांना देण्याचे ठरले होते. ते पितळ या कारवाईमुळे उघडे पडले. २०१८ शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील सरपंचालाही लाच प्रकरणी अटक केली होती. त्यामुळे लाचप्रकरणी सरपंच गजाआड होण्याची ही दुसरी घटना होय.
बीड येथे बदली झाल्याची चर्चा
लाचखोर प्रसेनजीत प्रधान यांनी काही दिवस प्रशिक्षणार्थी म्हणून करवीर प्रात पदावरही काम केले. त्यानंतर गेले सहा महिने ते राधानगरी प्रात पदाचा कारभार पहात होते, त्यांची भंडारा येथे बदली झाल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांच्यावर ही लाचेची कारवाई झाली. त्यामुळे बदलीवेळी जाता-जाता हात मारुन जाण्याच्या त्यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले.