शाहरुखला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत एकाचा मृत्यू, माफी मागून खटला संपवणार का 'किंग खान'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:39 IST2022-02-19T16:37:36+5:302022-02-19T16:39:15+5:30
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा २०१७ साली 'रईस' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाशी निगडीत एका खटल्यात गुजरात हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे.

शाहरुखला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत एकाचा मृत्यू, माफी मागून खटला संपवणार का 'किंग खान'?
अहमदाबाद-
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा २०१७ साली 'रईस' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाशी निगडीत एका खटल्यात गुजरात हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. शाहरुख विरोधात कोणताही खटला दाखल करण्याऐवजी अभिनेत्यानं घडलेल्या घटनेबाबत माफी मागावी असं कोर्टानं नमूद केलं आहे. वडोदरा रेल्वे स्थानकावर शाहरुख खान चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलेला असताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी शाहरुखवर खटला दाखल करण्यात आला आहे. याचीच सुनावणी गुजरातच्या हायकोर्टात सुरू आहे.
एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार २०१७ साली रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान यानं मुंबई ते दिल्ली असा रेल्वेनं प्रवास केला होता. रेल्वे जेव्हा गुजरातच्या वडोदरा स्थानकावर पोहोचली तेव्हा शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झाली होती. यावेळी चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी शाहरुख ट्रेनमधून बाहेर आला आणि त्यानं त्याचं एक टी-शर्ट व एक चेंडू चाहत्यांच्या दिशेनं फेकला होता. त्यानंतर झालेल्या गोंधळाला व जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. तसंच दोन पोलीस कर्मचारी देखील बेशुद्ध पडले होते.
स्थानिक काँग्रेस नेता जितेंद्र सोलंकी यांनी याच घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच आधारावर शाहरुख खान विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आयपीसीच्या कलम ३३६, ३३७, ३३८, रेल्वे अधिनियम १९८९ अंतर्गत कलम १४५, १५०, १५२, १५४ आणि १५५ (१) अंतर्गत आरोप शाहरुख खानवर लावण्यात आले होते. शाहरुखकडून त्याच्यावरील आरोप रद्द करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेण्यात आली होती. हायकोर्टानं याप्रकरणाच्या सुनावणीत जुलै २०१७ साली या प्रकरणाला स्थगिती दिली होती.
शाहरुखच्या वकिलांनी यावेळी कोर्टासमोर बाजू मांडताना शाहरुख रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरला नव्हता. त्यानं फक्त चाहत्यांना पाहून हात दाखवला आणि टीशर्ट चाहत्यांकडे फेकला. असं करणं कोणताही गुन्हा नाही, असं कोर्टासमोर म्हटलं. तसंच मृत्यू झालेला व्यक्ती आधीपासूनच हृदय विकारानं त्रस्त होता आणि त्याचा मृत्यू वेगळ्या कारणांमुळे झाला आहे, असा दावा केला. यावेळी न्यायाधीशांनी हलक्याफुलक्या अंदाजात दुसऱ्या पक्षाच्या वकिलांना जर समजा आम्ही शाहरुखला या प्रकरणाला सामोरं जाण्यास सांगितलं तर काय होईल याची कल्पना करा असं म्हटलं. तुम्हाला तशी अराजकता निर्माण करायची आहे का? असा सवाल केला. शाहरुखनं घडलेल्या प्रकरणावर एक माफीनामा कोर्टासमोर सादर करावा आणि प्रकरण संपुष्टात आणाव असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे. प्रकरणावरील पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आता शाहरुख खान माफीनामा सादर करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.