सब रजिस्ट्रारच्या घरावर छापा; माया पाहून अधिकारी चक्रावले, संपत्ती मोजून मोजून दमले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:33 AM2021-12-17T11:33:30+5:302021-12-17T11:33:42+5:30
भ्रष्ट सब रजिस्ट्रारची संपत्ती पाहून छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्याचे डोळे विस्फारले
पाटणा: बिहारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात विशेष दक्षता विभागाची कारवाई सुरू आहे. शुक्रवारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समस्तीपूरचे उपनिबंधक मनी रंजन यांच्या घरांवर छापा टाकले. रंजन यांच्याशी संबंधित ३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या दरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. उपनिबंधकानं जमा केलेली माया पाहून छापा टाकायला गेलेल्या अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले.
समस्तीपूरचे उपनिबंधक मणी रंजन यांच्या घरांवर विशेष दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. अवैधपणे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप रंजन यांच्यावर होता. अधिकाऱ्यांनी कारवाईत एकूण १.६२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी पाटणा, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूरमध्ये छापे टाकले. अवैध कमाई केल्याचा आरोप खरा असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं.
उपनिबंधकाविरोधात विविध गुन्हे दाखल
विशेष दक्षता विभागानं पाटण्याचे उपनिबंधक मनी रंजन यांच्या विरोधात भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९८८ च्या कलम १३ (बी), आर/डब्ल्यू १३ (१३) (डी), आर/डब्ल्यू कलम १२ आणि भारतीय दंड विधानाच्या कलम १२० बीच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर विभागानं उपनिबंधकाविरोधात कारवाई करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच शुक्रवारी सकाळी एकाचवेळी तीन ठिकाणी छापे टाकले गेले.
छापेमारीत सापडल्या ५०० आणि २००० ची बंडलं
समस्तीपूरमध्ये उपनिबंधक मणी रंजन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले गेले. त्यात विशेष दक्षता विभागाला ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांची बंडलं आढळून आली.