‘उत्पादन शुल्क’चा छापा, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 03:18 PM2022-08-10T15:18:35+5:302022-08-10T15:18:45+5:30
कारवाई-अकरा रबरी ट्यूबमध्ये हाेती ११०० लिटर दारू
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरून अवैध हातभट्टी दारूची जीपमधून वाहतूक हाेती. माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तालुक्यातील माळुंब्रा शिवारात जीपर कारवाई केली. यावेळी तब्बल २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अवैधरित्या दारू निर्मिती करणे, दारूची चोरटी वाहतूक व विक्रीला पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून छापेमारी केली जाते.
साेलापूर-तुळजापूर रस्त्यावरून अवैध हातभट्टी दारूची जीपमधून (क्र. एमएच.१२-एमआर. १४०८) वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार अधीक्षक गणेश बारगजे यांच्या आदेशानुसार तुळजापूर विभागाचे दुय्यम निरीक्षक सी. डी. कुंठे यांच्या पथकाने माळुंब्रा शिवारात सापळा लावून संबंधीत जीप पकडली. वाहनाची झाडाझडती घेतली असता, मिथून हरिबा चव्हाण, सुरेश शंकर राठाेड (रा. मुळेगाव तांडा, ता. साेलापूर) या दाेघांना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी त्यांच्या ताब्यातून ११ रबरी ट्युबमधील सुमारे १ हजार १०० लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. जीची किंमत ५५ हजार रूपये आहे.
दारूसह २ लाख २५ हजार रूपये किंमतीची कारही जप्त करण्यात आली. यानंतर संबंधित दाेघांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ.ई), ८१, ८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक सी. डी. कुंठे हे करीत आहेत. पथकात निरीक्षक सचिन भवड, निरीक्षक जे. बी. चव्हाण, पी. व्ही. गोणारकर, एस. डी. चव्हाण, सुखदेव सिंद, झेड. एस. काळे, आर. बी. चांदणे, अनिल कोळी, के. एस. देशमुख, व्ही. ए. हजारे यांचा समावेश हाेता.