महादेव ॲपप्रकरणी सेलिब्रिटी मॅनेजरवर छापे; सक्तवसुली संचालनालयाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 07:31 AM2023-09-23T07:31:55+5:302023-09-23T07:32:19+5:30
दोन कोटी ५० लाख रुपयांची रोकड जप्त
मुंबई : ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या महादेव ॲपविरोधात ईडीने कारवाईची व्याप्ती वाढवली असून या कंपनीच्या प्रवर्तकांकडून हवालाच्या माध्यमातून पैसे स्वीकारणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटीच्या व्यवस्थापकांवर (मॅनेजर) मुंबई व दिल्ली येथे छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान काही सेलिब्रिटी मॅनेजरच्या कार्यालयांतून एकूण अडीच कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणात गुंतलेल्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची देखील लवकरच ईडी चौकशी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचा फेब्रुवारी २०२३ मध्ये दुबईत आलिशान विवाह झाला होता. या विवाहाकरिता २०० कोटी रुपये रोखीने खर्च करण्यात आले होते, तर या विवाहाकरिता भारतातून अनेक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावत आपले कलाप्रदर्शन केले होते. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आर्थिक व्यवहार त्यांच्या मॅनेजरनी केला होता व त्यांचे मानधन रोखीने स्वीकारल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच रोखीने देण्यात आलेला पैसा हा हवालाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचे देखील ईडीच्या तपासात आढळून आले. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे.
लूक आऊट सर्क्युलर
या कंपनीने भारतामध्ये आजवर जो व्यवहार केला त्या माध्यमातून किमान पाच हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचा देखील ईडीला संशय असून त्या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे समजते. दरम्यान, कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर व उप्पल या दोघांविरोधात ईडीने लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.