नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 07:21 AM2024-10-30T07:21:20+5:302024-10-30T07:21:44+5:30
नायजेरियन व्यक्तींमार्फत चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती.
नवी मुंबई : नायजेरियन व्यक्तींच्या ड्रग्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून २६ लाख ७७ हजाराचे ड्रग्स व २२ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी २० नायजेरियन व्यक्तींवर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नायजेरियन व्यक्तींमार्फत चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती.
खारघर येथे नायजेरियन व्यक्तींसाठी चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून सहायक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे, अजय भोसले, हनीफ मुलाणी, अश्विनी पाटील व सुमारे १५० कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते.
यापूर्वी नायझेरियन व्यक्तींवर झालेल्या कारवाईदरम्यान पोलिसांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व प्रकारची पूर्वतयारी करून ठेवली होती. त्याद्वारे पथकाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास खारघर परिसरातील लेमन किचन व जेमिनी किचन या दोन हॉटेलवर धाड टाकली. त्यामध्ये २० नायजेरियन महिला व पुरुष डग्ज तसेच दारूची नशा करताना मिळून आले. त्याशिवाय घटनास्थळाच्या पाहणीत त्या ठिकाणी २६ लाख ७७ हजार रुपये किमतीचे १०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज व २२ हजार रुपये किमतीचा दारूसाठा मिळून आला.
अधिक तपास सुरू
याप्रकरणी संबंधितांवर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, त्यांना कोणी ड्रग्ज पुरवले, या नायजेरियन व्यक्तींचा ड्रग्स विक्रीत सहभाग आहे का? याचाही अधिक तपास पोलिस करत आहेत.