लातूर शहरातील कुंटणखान्यावर छापा; आंटी पाेलिसांच्या जाळ्यात
By राजकुमार जोंधळे | Published: July 22, 2023 11:26 AM2023-07-22T11:26:40+5:302023-07-22T11:26:57+5:30
गुन्हा दाखल : दाेन पीडितांची केली सुटका
लातूर : शहरातील अंबाजाेगाई राेड परिसरात स्वत:च्या राहत्या घरात कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेच्या घरावर पाेलिस पथकाने छापा मारला. यावेळी कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीला अटक केली असून, पीडित दाेन महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील अंबाजाेगाई राेड भागात राहणारी एक महिला इतर महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करून घेत असल्याची माहिती खबऱ्याने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाला दिली. या माहितीच्या आधारे प्रशिक्षणार्थी पाेलिस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या महिला पाेलिस उपनिरीक्षक श्यामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, अंमलदार जाधव, याेगी, सुधामती वंगे, लता गिरी यांच्या पथकाने महिलेच्या घरी डमी ग्राहक पाठवून छापा मारला. यावेळी घरात दाेन पीडित महिला आढळून आल्या. त्यांच्याकडून आंटी देहविक्रय व्यवसाय करून घेत हाेती. त्यांच्याकडून माेबाइल, राेख रक्कम आणि इतर साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पाेलिसांनी पीडित महिलांची सुटका केली असून, आंटीला अटक केली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.