मणेर मळ्यात व्हिडीओ पार्लरवर छापा; तिघांवर गुन्हा दाखल
By सचिन भोसले | Published: December 29, 2023 09:35 PM2023-12-29T21:35:31+5:302023-12-29T21:42:10+5:30
मणेर मळा येथे लकी व्हिडीओ गेम पार्लरमध्ये व्हिडीओ गेमचे मशीनमध्ये फेरफार करुन त्याव्दारे जुगार खेळ चालविला जात असल्याची माहिती मिळाली.
कोल्हापूर : उचगाव,मणेर मळ्यातील लकी व्हिडीओ पार्लरमध्ये व्हिडीओ गेम मशीनमध्ये फेरफार करून जुगार चालविला जातो. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत १४ व्हिडीओ मशीनसह रोख ९ हजार ७०० असा एकूण २ लाख ८९ हजार रूपये किंमतीचा जुगार गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध धंद्याविरूध्द कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक करून माहिती घेतली.
मणेर मळा येथे लकी व्हिडीओ गेम पार्लरमध्ये व्हिडीओ गेमचे मशीनमध्ये फेरफार करुन त्याव्दारे जुगार खेळ चालविला जात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी अविनाश जनार्दन मोळे रा. शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर याने समीर गुलाब चित्तेवान रा. कोल्हापूर याच्या नावाने व्हिडीओ गेमचे लायसंन्स घेवुन त्या लायनंन्समध्ये दिलेल्या नियमांचे व अटी-शर्तीचा भंग करून वेगवेगळ्या कंपनीची एकुण १४ व्हिडीओ गेमची मशिन बसविली.
तसेच साहील सुनिल देसाई वय २१, रा.शिंदे कॉलनी, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर याच्याकरवी व्हिडीओ गेम मशिनवर गेम खेळणाऱ्यांकडुन पैसे घेवुन व्हिडीओ गेम मशीनवर जुगार चालवित असल्याचे मिळुन आले. या ठिकाणी ९ हजार ७०० रुपये रोख रक्कम वेगवेगळया कंपनीची एकूण १४ व्हिडीओ गेम मशीन्स व इतर साहित्य असा एकूण २,८९,७००/- रुपये किंमतीचा जुगार गुन्ह्याचा मुद्देमाल मिळुन आला. तो माल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, पोलीस अमंलदार कृष्णात पिंगळे, सचिन देसाई, विलास किरोळकर, संजय पडवळ, हिंदुराव केसरे, अमित मर्दाने व रफिक आवळकर यांनी केली.