अवैध दारूप्रकरणी धाडसत्र; पथकाकडून ४० जणांना अटक, हजार लीटर दारू जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: December 18, 2023 10:13 PM2023-12-18T22:13:12+5:302023-12-18T22:13:30+5:30
सहा लाखांचा मुद्देमाल लागला हाती
राजकुमार जाेंधळे / लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारू विक्रीप्रकरणी राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत ३९ गुन्ह्यांत ४० जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास हजार लिटर देशी-विदेशी, हातभट्टी दारू जप्त केली आहे. यावेळी ५ लाख ८८ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला असून, ही कारवाई लातूर आणि उदगीर येथील पथकांनी १ ते १५ डिसेंबर या काळात संयुक्तपणे केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर आणि उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १ ते १५ डिसेंबर या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकल्या. यावेळी काही ढाब्यावर अवैध दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणात त्या ढाबा मालक-चालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विशेष माेहिमेअंतर्गत एकूण ३९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५५३ लिटर देशी दारू, ३३५ लिटर हातभट्टी आणि १२५ लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. शिवाय, गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन वाहनेही पथकाने ताब्यात घेतली आहेत.
ही कारवाई लातूर विभागाचे निरीक्षक आर. एस. काेतवाल, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, स्वप्नील काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, नीलेश गुणाले, मंगेश खारकर, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, एम. जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली.