मुंबई विमानतळ घोटाळ्यात ‘जीव्हीके’च्या ठिकाणांवर छापे; रेड्डी पितापुत्रावर सीबीआयकडून गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:36 AM2020-07-03T04:36:47+5:302020-07-03T04:37:14+5:30
2017-18 मध्ये 9 कंपन्यांच्या नावे बनावट कार्य कंत्राटे दाखवून 310 कोटी रुपये पळविण्यात आले. जीव्हीके समूहाला बेकायदेशीरीत्या 395 कोटींचे अर्थसाह्य' देण्यात आले.
मुंबई/नवी दिल्ली : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कारभारात ७०५ कोटी रुपयांच्या अनियमितता आढळल्याने जीव्हीके उद्योग समूहाचे चेअरमन वेंकट कृष्णा रेड्डी गणपती व त्यांचे पुत्र जी. व्ही. संजय रेड्डी यांच्याविरूद्ध सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. सीबीआयने बुधवारी रात्री समूहाच्या मुंबई व हैदराबाद ठिकाणांवर छापे मारले.
जीव्हीके एअरपोर्ट व एअरपोर्ट अॅथॉरिटी यांच्या एमआयएएलद्वारे सरकारी-खासगी भागीदारीत विमानतळ चालविले जाते. वाढीव खर्च, कमी महसूल व रेकॉर्डमध्ये हेराफेरी या मार्गांनी जीव्हीकेने ७०५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. वेंकट कृष्णा रेड्डी गणपती ‘एमआयएएल’चेही संचालक असून, पुत्र व्यवस्थापकीय संचालक आहेत. ‘एमआयएएल’मधील पैसा हस्तांतरित करण्यासाठी यांनी नऊ खासगी कंपन्या वापरल्याचे तपासात समोर आले आहे.
अधिकाऱ्यांशी संगनमत
जीव्हीके समूहाच्या प्रवर्तकांनी एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या अज्ञात अधिकाऱ्यांशी संगनमत करून विविध मार्गांनी पैशाचा अपहार केला. घोटाळ्याचा आकडा ८०५ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे सीबीआयचे म्हणणे आहे. मुंबई विमानतळाचे आधुनिकीकरण, देखभाल-दुरुस्ती व परिचालन यासाठी एअरपोर्ट अॅथॉरिटीने ४ एप्रिल २००६ मध्ये ‘एमआयएएल’सोबत करार केला होता.
2017-18 मध्ये 9 कंपन्यांच्या नावे बनावट कार्य कंत्राटे दाखवून 310 कोटी रुपये पळविण्यात आले. जीव्हीके समूहाला बेकायदेशीरीत्या
395 कोटींचे अर्थसाह्य' देण्यात आले.