बेकायदेशीर डान्स बारवर छापेमारी; १७ जण ताब्यात तर १० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 07:25 PM2019-08-21T19:25:38+5:302019-08-21T19:27:53+5:30
नगर येथून डीवायएसपी अजीत पाटील यांचे मार्गदर्शना खाली सुपा पोलीसांनी कारवाई केली.
पळवे ( जि. अहमदनगर) - नगर - पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटातील (ता. पारनेर) हॉटेलवर सुरू असलेल्या बेकायदा डान्सबारवर पोलिसांनी आदेश मिळताच मंगळवारी रात्री छापा टाकून 15 जणांना ताब्यात घेतले आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. दि. 21 रोजी पहाटे साडेचार वाजता गुन्हा दाखल झाला. नगर येथून डीवायएसपी अजीत पाटील यांचे मार्गदर्शना खाली सुपा पोलीसांनी कारवाई केली.
या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले म्हणाले, आरोपींची खरी ओळख पटविण्यास विलंब लागत आहे. सात डान्स बारबाला त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडील 66 हजार जप्त करुन उर्वरित दहा जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली. नगर-पुणे रस्त्यावरील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जातेगाव घाटातील हॉटेल जयराज येथे बेकायदा डान्सबार सुरू होता. या घटनेची माहिती खबर्याने पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना दिली. त्यावरून सिंधू यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून महिला व पुरुष अशा सुमारे दहा जणांना अटक केली. पोलीस आल्याचे समजताच काही जण पळून गेले. महाराष्ट्र हॉटेल उपग्रहे आणि मध्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबतचा कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे आहेत आरोपी
संजय विठ्ठलराव जाधव (वय 48 राहणार गंगापूर) प्रशांत अण्णासाहेब पाटील राहणार ( गंगापूर), अजित गुंडोपंत कदम (वय 44 राहणार लोहगाव ), कृष्णा सूर्याजी तोबरे (वय 24 राहणार लातूर), संदीप देविदास साबणे (वय 39 राहणार गंगापूर ), सय्यद नासिर सय्यद इस्माईल ( वय 40 राहणार गंगापूर), अमोल सुभाषराव वरकड (वय 41 राहणार गंगापूर), सारंगधर शंकरराव जाधव (वय 32 राहणार कासोडा तालुका गंगापूर), प्रदीप सत्यनारायण नवंदर ( वय 41 राहणार गंगापूर), वाल्मीक विठ्ठलराव शिरसाठ (राहणार गंगापूर), नितीन शेट्टी (हॉटेल चालक फरार), राजेंद्र सातव (हॉटेल मालक फरार)
पोलीसांकडून समजलेली माहिती अशी जातेगांव शिवारातील हॉटेल जयराजचे पहिल्या मजल्यावरील पार्टी हॉलमध्ये सात बारबाला आर्केस्ट्राच्या संगीताचे तालावर नाचगाणी करीत असताना, नमूद ग्राहक नृत्यगणांच्या अंगावर पैसे उधळून देत असताना, त्यांच्याशी गैरवर्तन असभ्य वर्तन करताना, आर्केस्ट्रा चालक व हॉटेल मॅनेजर ग्राहकांना प्रोत्साहित करताना मिळून आल्याने पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.