अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 07:37 PM2021-07-23T19:37:27+5:302021-07-23T19:38:09+5:30
Raid : आठ जणांवर तीन गुन्हे; पाच जणांना अटक
लातूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी छापे घालण्यात येत असून, गुरुवारी तीन ठिकाणी छापे टाकून आठ जणांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पाच आरोपींना अटक करून १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाळी येथील शिरूर ताजबंद ते उदगीर जाणाऱ्या रोडवर पत्र्याच्या शेडमध्ये मिलन डे, राजधानी डे जुगार चालत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे छापा मारला असता विक्रम विनोद शिंदे (रा. हाळी) हा जुगार खेळवित असताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून जुगार साहित्यासह रोख ४ हजार १७० रुपयांचा ऐवज जप्त केला. शिवाय, त्याच्यासह बुकी चालक जावेद शेख (रा. हाळी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच पथकाने आणखी एक छापा मारून परमानंद गुंडेराव वाघमारे (रा. हंडरगुळी), बालाजी रामराव वाघोजी (रा. हंडरगुळी) या दोघांना जुगार खेळवित असताना पकडले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ३३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात बुकीचालक बाबुलाल शेख (रा. हंडरगुळी) याच्याविरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाढवणा परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये टाईम बाजार नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून मोहिन मकबुल बागवान (रा. वाढवणा), हकिम बुरहान बागवान (रा. वाढवणा) या दोघांना जुगार खेळविताना पकडले. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिली.