हॉटेल, ढाब्यावर पथकाच्या धाडी; २० जणांना अटक; दोन ढाबा चालकांना ५० हजारांचा दंड
By राजकुमार जोंधळे | Published: December 24, 2022 06:21 PM2022-12-24T18:21:47+5:302022-12-24T18:23:04+5:30
उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथील मैत्री लंच हाेम या ढाब्यावर अवैध दारूविक्रीबराेबरच विनापरवाना दारू पिणाऱ्यांची वर्दळ असल्याची माहिती खबऱ्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्य पथकाला दिली. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या उदगीर आणि लातूर येथील पथकाने या ढाब्यावर धाड टाकली.
लातूर : जिल्ह्यातील वाढवणा पाटी (ता. उदगीर) येथील मैत्री लंच होम ढाबा आणि इतर विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. यावेळी एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत हॉटेल, ढाबाचालकासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन ढाबामालकांना ५० हजारांचा, तर मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथील मैत्री लंच हाेम या ढाब्यावर अवैध दारूविक्रीबराेबरच विनापरवाना दारू पिणाऱ्यांची वर्दळ असल्याची माहिती खबऱ्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्य पथकाला दिली. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या उदगीर आणि लातूर येथील पथकाने या ढाब्यावर धाड टाकली. यावेळी दाेन ढाबामालक आणि चार ग्राहक अशा सहा जणांना अटक करण्यात आली. गुन्ह्यामध्ये ३ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर नळेगाव, डाेंग्रज, जानवळ (ता. चाकूर) आणि हेर (ता. उदगीर) येथेही धाडी टाकण्यात आल्या. याप्रकरणी चार गुन्हे दाखल केले आहेत. येथील कारवाईत देशी दारू ९ लिटर, विदेशी दारू ४५ लिटर, असा एकूण २९ हजार ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एकूण १४ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दाेघा ढाबामालकाला ५० हजारांचा, तर मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राउत, उदगीर विभागाचे निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक अमाेल जाधव, स्वप्नील काळे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान संताेष केंद्रे, हनुमंत मुंडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.