अवैद्य दारु विक्रेत्यांवर छापे; आडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल
By राम शिनगारे | Published: September 21, 2022 06:36 PM2022-09-21T18:36:54+5:302022-09-21T18:37:28+5:30
कारवाईत सहा जणांच्या विरोधात विविध ठाण्यात गुन्हे नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
औरंगाबाद - अवैध मद्यविरोधी पथकाने नियमबाह्यपणे दारु विकणाऱ्या सहा जणांच्या अड्ड्यांवर छापे मारुन २ लाख ५८ हजार २५५ रुपयांचा मद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा जणांच्या विरोधात विविध ठाण्यात गुन्हे नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड हे पथकासह गस्तीवर असताना सूर्यभान फुलचंद दाभाडे (रा. गोलवाडी) हा पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारु विकत होता. त्याच्याकडून ६० बाटल्या जप्त केल्या. संतोष कैलास नाडे (रा. गौतमनगर, एन ७ सिडको) हा राहत्या घरासमोर दारु विकताना पकडला. सज्जन हिरचंद गुसिंगे (रा. गोकुळवाडी) हा राहत्या घरची दारु विकत होता. त्याच्याकडे १४४ बॉटल सापडल्या. नवाब खान गुलाब खान (रा. इंदिरानगर, गारखेडा) हा सुद्धा राहत्या घरीच दारु विकताना पकडला. त्याच्याकडे २०५ बाटल्या आढळल्या.
किरण शांताराम भोळे (रा. गल्ली नं. ७, मुकुंदवाडी) हा दुचाकवरुन दारुचे दोन बॉक्स घेऊन जाताना पकडला. राहुल पुनमचंद काळे (रा. वडगाव कोल्हाटी) हा चारचाकी गाडीतुन अवैध दारुची तस्करी करताना पकडला. त्याच्याकडे ९६ बॉटल आढळून आल्या. या सर्वांच्या विरोधात छावणी, सिडको, दौलताबाद, जवाहरनगर, मुकुंदवाडी आणि छावणी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. ही कामगिरी निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि ज्ञानेश्वर अवघड, पोलीस मनोज चव्हाण, सुनील जाधव, परशुराम सोनुने, नितेश सुंदर्डे, अभिजीत गायकवाड आणि आरती कुसळे यांच्या पथकाने केली.