बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा; कऱ्हाडमध्ये ५० पेक्षा जास्त जनावरांची केली सुटका
By संजय पाटील | Published: March 29, 2024 09:37 AM2024-03-29T09:37:20+5:302024-03-29T09:44:15+5:30
पोलीस फौजफाटा तैनात, कऱ्हाडामधील मोठी कारवाई
संजय पाटील, कऱ्हाड : शहरातील मंडईत चालविल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून ५० पेक्षा जास्त जनावरांची सुटका करण्यात आली. यावेळी काही जनावरांची कत्तल करण्यात आल्याचेही पोलिसांना दिसून आले. या कारवाईसाठी साताऱ्यातून मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. साताऱ्यातील विशेष पथकासह, कऱ्हाडातील पोलीस उपाधीक्षक कार्यालय तसेच शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली.
शहरातील भाजी मंडईत बेकायदेशीर कत्तलखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाकडून गत काही दिवसांपासून खातरजमा केली जात होती. कत्तलखान्यात गोवंशीय जनावरे आणली जाणार असल्याचे समजल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून पोलिसांनी त्याठिकाणी वॉच ठेवला होता. शुक्रवारी पहाटे पोलीस बंदोबस्तासह त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी ५० पेक्षा जास्त जनावरे त्याठिकाणी आढळून आली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी काही जनावरांची कत्तल करण्यात आल्याचेही दिसून आले.
पोलिसांनी कत्तलखान्यातील जनावरे ताब्यात घेतली. तसेच याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईवेळी मंडई परिसरासह शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी साताऱ्याहून जादा पोलीस कुमक मागविण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.