ऑनलाइन जुगाराच्या अड्ड्यावर छापा; चौघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 06:17 AM2021-01-03T06:17:21+5:302021-01-03T06:17:32+5:30
crime news गुन्हे शाखेची कारवाई : मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता; संभाजी पाटील सूत्रधार
सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लॉटरी सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या ऑनलाइन जुगारावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेल्या मुख्य आरोपीमार्फत नवी मुंबईसह पनवेलमध्ये दहाहून अधिक ठिकाणी अड्डे चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, त्याने लॉटरी सेंटरमध्ये नोकरीच्या बहाण्याने अनेकांची पिळवणूक केल्याचेदेखील समजते.
सीबीडी सेक्टर-६ येथील रईस ऑनलाइन ऑक्शन सेंटरमध्ये ऑनलाइन जुगार चालत होता. त्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरला दुपारी कोल्हटकर यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे संगणकाद्वारे एक व दोन आकड्यांचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. एसडीएस ब्रोकिंग व ट्रेडिंग आणि आविष्कार ब्रोकिंग व ट्रेडिंग या दोन कंपन्यांमार्फत हा जुगार चालवला जात होता.
याप्रकरणी तिथल्या काही व्यक्तींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. संभाजी पाटील याच्याकडून हा ऑनलाइन जुगार चालवला जात होता. यामध्ये राजेंद्र पाटील, योगेश काळोखे व प्रमोद खोत हे त्याचे तीन भागीदार आहेत. त्यापैकी खोत हा दहिसर मोरीचा राहणारा असून उर्वरित तिघे कोपरखैरणेत राहणारे आहेत. या चौघांवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काम करणारी मुले सांगली, कोल्हापूरची
नवी मुंबईसह पनवेल मध्ये ऑनलाइन जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत. जुगाराच्या अड्ड्यांवर काम करण्यासाठी संभाजी याने काही मुलांना कामावर ठेवले होते. त्यापैकी काही मुले सांगली व कोल्हापूर येथून आणली होती.