रायगड पोलिसांना तिसऱ्या डोळ्याची साथ, CCTV मुळे ४२ गुन्हे उघडकीस
By निखिल म्हात्रे | Published: January 11, 2023 06:23 PM2023-01-11T18:23:34+5:302023-01-11T18:25:38+5:30
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत.
अलिबाग : रायगडपोलिसांना गुन्ह्यांची उकल करताना तिसऱ्या डोळ्याची महत्त्वपूर्ण साथ मिळत आहे. रायगड जिल्ह्यात पोलिसांनी नागरिक, संस्था, आस्थापना यांच्या मदतीने ठिकठिकाणी १२ हजार ४९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चित्रीकरणामुळे या मागील वर्षभरात महत्त्वाचे ४२ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मागील २०२२ या वर्षभरात रायगड पोलिसांनी नागरिक, संस्था, आस्थापना यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १२ हजार ४९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असून, ते सर्व चालू स्थितीत आहेत.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरिकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात दिवसाला ६ ते ७ गुन्ह्यांची नोंद होत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. तर दुकानदारांचा होणार सन्मान दुकानदार, क्लाॅथ सेंटर, ज्वेलर्स, दूध डेअरी मालकांनी सीसीटीव्ही लावताना ते रस्त्याच्या दिशेने लावा, जेणेकरून संशयित हालचालींवर लक्ष राहील. तर दुसरीकडे या सीसीटीव्हीमुळे एखादा गुन्हा डिटेक्ट झाला, तर संबंधित दुकानदाराला पोलिसांच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत सद्य:स्थितीत १२ हजार ४९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे गुन्ह्यांचा तपासादरम्यान उपयुक्त ठरत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे वर्षभरात ४२ गुन्हे उघडकीस आणण्यात मदत झाली आहे. जिल्हाभरातील पोलिसिंग अधिक फास्ट करीत जिल्ह्यातील अतीगंभीर ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, रायगड.