कर्जतमध्ये जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांची धाड, ४५ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 12:54 AM2020-09-01T00:54:03+5:302020-09-01T00:54:33+5:30
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलनगर येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर बंद कार्यालयात अनधिकृत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कर्जत - शहरामधील विठ्ठलनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांनी धाड टाकली. रविवारी पहाटे छापा टाकून केलेल्या धडक कारवाईत ४५ जणांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आले. जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि वाहने असा ३८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या जुगारींमध्ये रायगडसह मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिकमधील लोकांचा समावेश आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलनगर येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर बंद कार्यालयात अनधिकृत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये वडखळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहायक फौजदार पिंगळे, महिला पोलीस हवालदार धूपकर, पोलीस नाईक म्हात्रे, तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दिनेश पाटील, पोलीस शिपाई बेंद्रे, केंद्रे, वडखळ पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ३० आॅगस्ट पहाटे छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी या ठिकाणी ५ टेबलच्या भोवती खुर्च्यावर बसून काही व्यक्ती वेगवेगळे तीन पत्ती जुगारचे डाव खेळत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्या सर्व ४५ जणांवर कारवाई करून अटक केली. त्या ठिकाणी जुगार खेळण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह एकूण ७ लाख ६४ हजार ७८० रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. जुगार खेळणाऱ्यांनी आणलेली ९ वाहने असा एकूण ३८ लाख ६४ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल आहे.
पकडण्यात आलेले जुगारी मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील असून, काही कर्जत तालुक्यातीलही आहेत. या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत. सध्या गणेशोत्सव काळात जुगार अड्ड्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी यापूर्वीच पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात अशा प्रकारे कोठेही बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात असल्यास, त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास तात्काळ कळवावी, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले. अटक करण्यात आलेल्या ४५ जणांमध्ये ४३ पुरुष आणि दोन महिला यांचा समावेश आहे.