एलपीजी-प्राेपॅन मिक्सींग प्रकरणी रायगड पाेलिसांचा छापा नऊ टॅंकरमधील 162 टन साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:16 PM2020-11-25T23:16:57+5:302020-11-25T23:17:24+5:30
खालापूर तालुक्यातील पाैद येथील गॅस सिलेंडर रिफील करणाऱ्या काॅन्फीडंस इंडिया पेट्राेलीयम लि. कंपनीमध्ये एलपीजी आणि प्राेपेन गॅसची भेसळ हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.
आविष्कार देसाई
रायगड - खालापूर तालुक्यातील पाैद येथे एलपीजी आणि प्राॅपेनची भेसळ केल्याप्रकरणी रायगड पाेलिसांनी माेठी कारवाई केली आहे. पाेलिसांनी केलेल्या छाप्यामध्ये नऊ टॅंकरमधील सुमारे 162 टन साठा जप्त केला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी लाेकमतशी बाेलताना दिली. पाेलिसांनी याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
खालापूर तालुक्यातील पाैद येथील गॅस सिलेंडर रिफील करणाऱ्या काॅन्फीडंस इंडिया पेट्राेलीयम लि. कंपनीमध्ये एलपीजी आणि प्राेपेन गॅसची भेसळ हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.याच कंपनीच्या बाजूला असणाऱ्या जागेमध्ये भेसळ सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानुसार खालापूर पाेलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये 9 टॅंकर सापडले. पैकी दाेन टॅंकर हे प्राॅपेन गॅसचे तर उवर्रीत सात हे एलपीजी गॅसचे आहेत. त्यामध्ये सुमारे एकूण 162 टन साठा सापडला आहे. पाेलिसांनी टॅंकर सील केले आहेत. तसेच या ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त ठेवला आहे. पाेलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याने तेथील कामगारांची एकच धावपळ सुरु झाली. त्यातील काही कामगांरानी व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
सदरचे काही टॅंकर हे गुजरात जामनगर येथून आले असल्याकडेही सुत्रांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे यामागे माेठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काॅन्फीडंस इंडिया पेट्राेलीयम लि.कंपनीमध्ये पाहणी करण्यासाठी गेलाे हाेताे. तांत्रीक तज्ञांचा अहवाल मागवला आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. अद्याप काेणालीही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती खालापूरचे उपविभागीय पाेलिस अधिकारी संजय शुक्ला यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.
याबाबत कंपनीने केलेला खुलासा
कंपनीकड़े एलपीजी, प्रोपेन हाताळणे, साठा करणे ह्यासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या आहेत. तसेच शासकीय आदेशानुसार, सर्व बाबींची पुर्तता करून एलपीजी व्यवसायाची सर्व कामे पार पडली जात असून प्लांटचे परवाने (लायसन्स) २०२३ पर्यंत बहाल केले आहेत. काही व्यावसायिक शत्रु यांच्या चुकीच्या तक्रारीमुळे हा नाहक बदनामी केली जात आहे.