रेल्वे भरती पेपर फोडला, १५ जणांवर गुन्हा दाखल; पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:49 AM2024-01-10T08:49:34+5:302024-01-10T08:50:04+5:30
हॉटेलमध्ये पेपर केला लीक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वेमध्ये भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धापरिक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी सीबीआयने रेल्वेच्या नऊ कर्मचाऱ्यांसह खासगी कंपनीत काम करणाऱ्या सहा अशा एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच याच अनुषंगाने मंगळवारी सीबीआयने मुंबई, सूरत, अमरेली, नवसारी, बक्सर येथे एकूण १२ ठिकाणी छापेमारी केली. या परीक्षेत झालेल्या घोटाळा प्रकरणी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.
रेल्वेमध्ये कनिष्ठ लिपिक तथा टायपिस्ट या पदासाठी ३ जानेवारी २०२१ रोजी परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी देशभरातून ८६०३ उमेदवारांनी अर्ज केला होता. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार होती. याकरिता मुंबईतील अंधेरीस्थित एका कॉम्प्युटर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने रेल्वेमध्ये ट्रॅकमनचे काम करणाऱ्या नऊ लोकांनी परीक्षेपूर्वीच पेपर व त्यांची उत्तरे मिळवत काही उमेदवारांना विक्री केली.
हॉटेलमध्ये पेपर केला लीक
धक्कादायक गोष्ट म्हणजे, सूरतमध्ये तर एका हॉटेलमध्ये जाहीरपणे हा पेपर व त्याची उत्तरे उमेदवारांना वाटण्यात आली होती. परीक्षेनंतर संबंधित उमेदवारांना त्यांची गुणपत्रिका देखील निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्हॉट्स ॲपद्वारे पाठविण्यात आली होती. या प्रकरणी घोटाळा झाल्याच्या संशय आल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने रेल्वेच्या तसेच कॉम्प्युटर संस्थेच्या अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.