Raj Kundra Arrest : राज कुंद्राचे Whats App चॅट आले समोर; अशी सुरु होती लाखो रुपयांची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:05 PM2021-07-20T16:05:41+5:302021-07-20T16:57:36+5:30
Raj Kundra Arrest: रेव्हेन्यूबाबत आणि फाईल कशी पाठ्वण्याबाबत चॅटिंग झाल्याचं या चॅटमधून हे उघडकीस आले आहे
अश्लील चित्रपट बनवण्याच्या व प्रसारित करण्याच्या आरोपाखाली मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सोमवारी अटक केली. या प्रकरणात आता राज कुंद्राचे चॅट चव्हाट्यावर आले आहे. या चॅट्समध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी हॉटशॉट्स डिजिटल ऍप्लिकेशन मिळविण्याविषयी बोलत आहेत. तसेच रेव्हेन्यूबाबत आणि फाईल कशी पाठ्वण्याबाबत चॅटिंग झाल्याचं या चॅटमधून हे उघडकीस आले आहे. तसेच या चॅटवरून राज कुंद्रा अश्लील चित्रपटांद्वारे इतर देशांतून रोज लाखो रुपये कमवत होता.
राज कुंद्रा आणि प्रदीप बक्षी यांच्या चॅटच्या प्रती लोकमतच्या हाती लागल्या आहेत. या चॅटमध्ये राज कुंद्राने स्वतःचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचा अॅडमिनही राज कुंद्रा आहे. राज याच्या व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये मेघा व्हियान खाती, प्रदीप बक्षी, रॉब डिजिटल मार्केटिंग हॉटशॉट्स आणि रॉय इव्हान्स कंटेंट हेड हॉटशॉट्स हे देखील सामील आहेत. या ग्रुपमध्ये ऍड करण्यास बक्षी कुंद्राला सांगताना या चॅटमधून समोर आलं आहे.
हे व्हॉट्स अॅप चॅट्स ऑक्टोबर 2020 मधील आहेत. या चॅट्सवरून असे दिसून आले आहे की, ऍपला दररोज थेट शोद्वारे 1.85 लाख रुपये आणि सिनेमांकडून दिवसाला 4.53 लाख रुपये मिळकत होती. त्यावेळेस अश्लील कॉन्टेन्ट असलेल्या हॉटशॉट्सचे २० लाख स्बस्क्रायबर होते.
या चॅटमध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षी यांच्याशी शोच्या कलाकारांच्या थकबाकी लवकरात लवकर भरण्यासाठीदेखील बोलत आहेत. राज कुंद्राने बक्षी यांना सांगितले की, लाईव्ह करणाऱ्या प्रिया सेनगुप्ता हिला पैसे मिळालेले नाहीत आणि ते त्वरित देण्यात यावे. 10 ऑक्टोबरच्या चॅटमधून असेही समोर आले आहे की, एकूण 81 कलाकारांनी वेळेवर पैसे न मिळाल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत.
फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हे शाखेने मुंबईत अश्लील चित्रपट बनविण्याप्रकरणी आणि काही अॅप्सवर दाखविल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. एका अश्लील चित्रपटासाठी कलाकारांना भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या आठवड्यात दोन एफआयआर नोंदवून दहा लोकांना अटक केली होती. गुन्हे शाखेने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.