दोन महिन्यांनी राज कुंद्रा कारागृहाबाहेर; बक्षीसह श्रीवास्तवविरोधात लूक आउट नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:46 AM2021-09-22T11:46:25+5:302021-09-22T11:47:18+5:30
सोमवारी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला. कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थॉर्पलाही जामीन मिळाला आहे.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफीप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात होता. तब्बल ६२ दिवसांनंतर राज कुंद्राला सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी तो आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडला; पण यावेळी कुंद्राने प्रतिक्रिया देणे टाळले.
सोमवारी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला. कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थॉर्पलाही जामीन मिळाला आहे. पतीला जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात, असे नमूद करत शिल्पाने एक फोटो तिच्य़ा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला होता. मंगळवारी कुंद्रा कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तर दुसरीकडे या प्रकरणातील पाहिजे आरोपी बक्षीसह श्रीवास्तव विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मालमत्ता कक्षाने फेब्रुवारी महिन्यात पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यात सुरुवातीला ९ जणांविरुद्ध १ एप्रिल रोजी ३ हजार ५२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. पुढे यात, विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या उमेश कामतच्या चौकशीतून कुंद्रा याचे अनेक कारनामे बाहेर आले. मालमत्ता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पॉर्न केसच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असताना हॉटशॉट ॲपचा कुंद्राच सूत्रधार असल्याचे आढळून आले. त्यानुसार कुंद्रासह साथीदार रायन थॉर्पला १९ जुलै रोजी अटक केली. याप्रकरणी कुंद्रा, रायनसह सिंगापूर येथे राहणारा पाहिजे, आरोपी यश ठाकूर ऊर्फ अरविंदकुमार श्रीवास्तव, लंडन येथील रहिवासी कुंद्रा याचा भाऊजी प्रदीप बक्षीविरोधात किल्ला कोर्टात १ हजार ४६४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टीसह ४३ जणांना साक्षीदार करण्यात आले आहे.