राज कुंद्राची साथीदारासह जामिनावर सुटका; पोर्नोग्राफिक फिल्म्स प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 06:53 AM2021-09-21T06:53:07+5:302021-09-21T06:54:23+5:30
आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. आपल्याला केवळ बळीचा बकरा बनवण्यात येत आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे.
मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करून त्यांचे अँपद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा व त्याचा सहकारी रायन थोर्प यांची ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी जामिनावर सुटका केली. मुंबई पोलिसांनी काहीच दिवसांपूर्वी पोर्नोग्राफीक फिल्म्स प्रकरणी पुरवणी आरोपपत्र सादर केले. त्या आरोपपत्रात राज कुंद्रा याचे आरोपी म्हणून नाव आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात राज कुंद्रा याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. आपल्याला केवळ बळीचा बकरा बनवण्यात येत आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे. तसेच या प्रकरणात आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे आपलीही जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी विनंती कुंद्रा याने न्यायालयाला केली.
एफआयआरमध्ये नाव नसतानाही आपल्याला या प्रकरणात नाहक खेचण्यात आले आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. कुंद्राची जामिनावर सुटका केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करेल आणि साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने कुंद्रा व त्याचा आयटी सहकारी रायन थोर्प यांची जामिनावर सुटका केली.