पॉर्न फिल्म प्रकरण: राज कुंद्रा, रायन थॉर्पची जामिनावर सुटका नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:58 AM2021-08-08T06:58:45+5:302021-08-08T06:59:03+5:30

न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता.

Raj Kundra Ryan Thorpes petition dismissed in pornography case | पॉर्न फिल्म प्रकरण: राज कुंद्रा, रायन थॉर्पची जामिनावर सुटका नाहीच

पॉर्न फिल्म प्रकरण: राज कुंद्रा, रायन थॉर्पची जामिनावर सुटका नाहीच

googlenewsNext

मुंबई : अश्लील चित्रपटांची निर्मिती करून त्या प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा व त्याच्या कंपनीतील आयटी प्रमुख रायन थॉर्प यांची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने शनिवारी नकार दिला.

न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने या दोघांच्या जामीन अर्जावरील निकाल २ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता. या प्रकरणात कुंद्रा व थॉर्प हे १९ जुलैपासून अटकेत आहेत. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज २८ जुलै रोजी फेटाळले. त्यानंतर त्यांनी अटक कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. न्या. गडकरी यांनी या दोघांचा युक्तिवाद फेटाळत म्हटले की, दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली कोठडी कायद्यास अनुसरून आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.

या दोघांनाही आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केल्याचे याचिकेत म्हटले होते. अटक करण्यापूर्वी फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) ४१ (ए) दिली नाही. ४१ (ए) कलमानुसार, आरोपीला अटक करण्याची आवश्यकता नसेल तर पोलीस त्याला समन्स बजावून त्याचा जबाब नोंदवू शकतात. मात्र, पोलिसांनी कायद्याने बंधनकारक असलेली नोटीस बजावली नाही, असे कुंद्रा याने  उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.

राज्य सरकारने कुंद्राच्या जामिनावर आक्षेप घेतला होता. आरोपी पुरावे नष्ट करत असताना तपास यंत्रणा बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. कुंद्राच्या कार्यालयातील लॅपटॉपमधून पोलिसांना ६८ पॉर्न व्हिडिओ सापडले. आधी ५१ व्हिडिओ जप्त केले होते. 
तसेच हॉटशॉट व बॉलीफेम या दोन ॲपची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आढळली, असे पै - कामत यांनी न्यायालयाला सांगितले होते.
 

Web Title: Raj Kundra Ryan Thorpes petition dismissed in pornography case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.