Raj Kundra: खुलासा! राज कुंद्राच्या कार्यालयात आढळली गुप्त तिजोरी; गैरकारनाम्यांचे 'राज' आता उघड होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:12 AM2021-07-26T07:12:08+5:302021-07-26T07:15:21+5:30
चार कामगार होणार साक्षीदार; बनवायचा रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रा याच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्त्वपूर्ण पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये एका गुप्त तिजोरीचाही समावेश आहे. त्यात कुंद्राच्या व्यवसायासंबंधी अनेक महत्त्वाच्या फाइल्स आहेत. एका ब्रिटिश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहितीही त्यातून समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, बेकायदेशीर कारनाम्यांचे ‘राज’ आता कुंद्रा याच्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून उघड होण्याची शक्यता आहे. त्याच्या कार्यालयात कामाला असलेल्या चार कामगारांनी त्याच्या गैरकृत्यांची पोलखोल केली आहे. पोलिसांकडून त्यांना साक्षीदार बनविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यांचा सविस्तर जबाब नोंदविला जात आहे. ‘हॉट शॉट’च्या कन्टेंटसाठी रोज नवा व्हॉट्स ॲप ग्रुप बनवला जायचा, असाही खळबळजनक खुलासा झाला असल्याचे समजते.
पोर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्राने कानावर हात ठेवले असले तरी अन्य उपलब्ध पुराव्यांमधून त्याचा सहभाग उघड होत आहे. अंधेरीच्या ऑफिसमधील कामगारांची चौकशी करण्यात आली. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत बरीच माहिती दिली असल्याने पोलिसांना भक्कम पुरावे उपलब्ध होणार आहेत. या चौघांना साक्षीदार करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरविले आहे. हे रॅकेट कसे चालायचे, राजचा त्याच्यात किती सहभाग होता, त्याने त्यांना त्याबाबत काय सूचना केल्या होत्या, याचा जबाब तपशीलवार नोंदवून घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपासात कुंद्राची नकारघंटा कायम
गेल्या सोमवारपासून गुन्हा अन्वेषण शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या ताब्यात असलेल्या राज कुंद्राने आपल्या कृत्याची अद्याप कबुली दिलेली नाही. हॉट शॉटच्या निर्मितीमध्ये आपला कसलाही सहभाग नाही, केवळ चार महिने मेंटेनन्सची जबाबदारी सांभाळली होती, त्या कालावधीत काय बनविण्यात आले व कोणत्या ‘फॉरमॅट’मध्ये उपलब्ध केले गेले, याची माहिती आपल्याला नसल्याचा दावा त्याने केला आहे.
चौकशीवेळी शिल्पा रडली
शिल्पा शेट्टीची जुहूमधील बंगल्यात शुक्रवारी सुमारे ६ तास चौकशी झाली. काही प्रश्नांची उत्तरे देताना ३ ते ४ वेळा तिला अश्रू रोखता आले नाहीत.