पॉर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्रा यांच्या कंपनीच्या संचालकाला झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:19 AM2021-02-09T03:19:20+5:302021-02-09T03:19:38+5:30
मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने सोमवारी बेड्या ठोकल्या
मुंबई : पॉर्न फिल्म प्रॉडक्शनप्रकरणी गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केलेल्या अभिनेत्री गहना वशिष्ठला एका व्हिडीओमागे लाखो रुपये मिळत होते. यात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीज लि. कंपनीचा तो व्यवस्थापकीय संचालक आहे.
मालमत्ता कक्षाच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक ॲप तयार केला होता. यावरून तो व्हिडीओ अपलोड करायचा. गहनाकड़ून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. या प्रकरणातील ही सातवी अटक आहे. कामत हा विआन इंडस्ट्रीज कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. जास्तीचे पैसे कमाविण्यासाठी तो यात सहभागी झाला. यात ‘विआन’चे काही कनेक्शन आहे का?, फंडिंग कोण करत होते? या दिशेनेही तपास करीत आहेत. यात गरज पडल्यास राज कुंद्रा यांचीही चौकशी होऊ शकते. कामतला १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून २ जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. ही मंंडळी लिंक शेअर करण्यासाठी याचाच वापर करीत होती.
अन्य कलाकार रडारवर
मालमत्ता कक्षाच्या रडारवर सध्या बॉलिवूडमधील अन्य कलाकार, मॉडेल आणि प्रॉडक्शन हाऊस असून त्यांचाही तपास सुरू आहे. त्यामुळे यात, बॉलिवूडमधील अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका व्हिडीओमागे मिळायचे लाखो रुपये
गहनाला एका व्हिडीओमागे लाखो रुपये मिळत होते. आतापर्यंत तिने ८० हून अधिक व्हिडीओ बनविले आहेत.