सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 16:40 IST2024-05-20T16:39:28+5:302024-05-20T16:40:19+5:30
विशेष पॉक्सो न्यायालयाने सख्खे भाऊ असलेल्या दोन्ही मुख्य आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
Rajasthan Crime :राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील पॉक्सो न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, याविरोधात सरकारी पक्ष उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.
सविस्तर माहिती अशी की, 2 ऑगस्ट 2023 रोजी 14 वर्षीय मुलगी गुरे चारण्यासाठी शेतात गेली अन् बेपत्ता झाली. बराच शोध घेतल्यानंतर तिच्या शरीराचे जळालेले अवयव एका वीट भट्टीत सापडले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर, तिची हत्या करुन मृतदेह भट्टीत टाकल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी सख्खे भाऊ असलेले मुख्य आरोपी कालू आणि कान्हा कालबेलिया यांच्यासह इतर सात जणांना अटक करण्यात आले होते.
हा खटला भिलवाडा जिल्ह्यातील पॉक्सो कोर्टात सुरू होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुनावणीअंती न्यायाधीशांनी कालू आणि कान्हाला फाशीची शिक्षा सुनावली. पण, या घटनेतील पुरावे नष्ट करणाऱ्या इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता या सरकारी वकिलांमार्फत निर्दोष सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.